पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृहाचा प्रश्न सध्या चांगलाच गाजत आहे. भोजनालयात काल झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी दंगा घातला आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली. यासंबंधी 12 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृहातील वाद काय आहे?
या भोजनगृहात जेवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. या भोजनगृहाची क्षमता 750 इतकी आहे. तर इथे 850 पेक्षा जास्त मासिक सदस्य आहेत.
इथे मिळणाऱ्या जेवणाबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या गेल्या आहेत. जेवणात अळ्या निघणं, कीडे निघणं, जेवण कच्चं असणं यासारख्या तक्रारी विद्यार्थी करत असतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विविध संघटनांनी वेळोवेळी आंदोलनं केली आहेत. 20 मार्चला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने भोजनगृहात आंदोलन केलं.
या सगळ्या आंदोलनांची दखल घेऊन विद्यापीठाने भोजनगृहाच्या संदर्भात नवीन नियमांचं एक परिपत्रक काढलं.
यातले काही नियम पुढीलप्रमाणे-
1) एक एप्रिलपासून जे या भोजनगृहाचे मासिक सदस्य नाहीत, त्यांना इथे जेवण मिळणार नाही. फक्त सदस्यांनाच जेवण मिळेल. जे सदस्य नाहीत त्यांच्या जेवणाची व्यवस्था मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह 8 आणि 9 इथल्या भोजनगृहात उपलब्ध करुन देण्यात येईल.
2) एका थाळीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी जेवण करु नये, या प्रचलित नियमांची काटेकोर अंमलबाजावणी करावी
3) भोजनगृहातील नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना भोजनगृहामध्ये येण्यास प्रतिबंध करावा
4) भोजनगृहातील दूरदर्शन संच काढून त्याठिकाणी विद्यापीठातर्फे चालवण्यात येणारी विद्यावाणी रेडिओ ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
यातील नियमांना विद्यार्थ्यांनी विरोध केला आणि त्यासाठीच आंदोलनाचं आयोजन केलं होतं. एका थाळीत किती जण जेवतात, याला बंधन नसावं असं त्यांचं म्हणणं आहे (कारण थाळी लिमिटेड आहे). तसंच सदस्य नसलेल्यांनाही इथे जेवण उपलब्ध असावं, असं त्यांचं म्हणणं आहे.
कालच्या गोंधळानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि एक निवेदन दिलं. ते पुढीलप्रमाणे-
विद्यापीठाची भूमिका
· विद्यार्थ्यांना भोजनाची चांगली सुविधा देता यावी, यासाठी मध्यवर्ती भोजनालयात नियमित मासिक सदस्यांनाच भोजन उपलब्ध करुन दिले जाईल. इतर विद्यार्थी आणि अभ्यागतांना वसतिगृह क्र. 8, 9 येथील भोजनालये, मुलींसाठी त्यांच्या वसतिगृहातील भोजनालय तसेच, आवारातील तीन कँटीन येथील व्यवस्था आहे.
· विद्यार्थ्यांना चांगली सुविधा देता यावी यासाठीच हे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत सहकार्य करावे.
· याबाबत विद्यार्थ्यांचे काही आक्षेप असल्यास त्यांनी ते भोजनालय समितीकडे सनदशीर पद्धतीने नोंदवावेत.
यानंतर आज या भोजनगृहात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत जेवण करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनालयात आंदोलन, 12 विद्यार्थ्यांवर गुन्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2019 04:31 PM (IST)
जे या भोजनगृहाचे मासिक सदस्य नाहीत, त्यांना इथे जेवण मिळणार नाही. फक्त सदस्यांनाच जेवण मिळेल, असा नियम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जारी केल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -