पालघर : पालघर लोकसभेची भाजपाची पारंपारिक हक्काची जागा शिवसेनेला बहाल केल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मतदान करायचे तर कोणत्या निशाणीवर कारायचे हा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. नुकतीच मनोरजवळील चिल्हार फाट्याजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगत भाजपचे कार्यकर्ते मढवी यांच्या श्री गणेश बंगल्यावर पालघर जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापले मत व्यक्त केले. त्यामध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आली की, शिवसेनेच्या उमेदवारासाठी पालघर जिल्ह्यातील भाजपाचा कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रचार करणार नसून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्धार केला आहे. तर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बुधवारी आपापल्या पदांचे राजीनामे वरिष्ठांकडे देऊन ते मुख्यमंत्र्यांना सोपविणार असल्याचे सांगण्यात आले.


त्यामुळे पालघर लोकसभा अज २२ या जागेसाठी होणारी निवडणूक अतिशय चुरशीची होणार यात शंकाच नाही. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीवेळी मयत खासदार चिंतामण वणगा यांच्या कुटुंबियांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याने, वनगा कुटुंबीय नाराज झालं. यानंतर श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन खासदारकीची निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. तर राजेंद्र गवितांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश घेतला आणि विजय मिळवला. मात्र आता ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे खासदार राजेंद्र गावितांची नामुष्की झाली आहे. पूर्वीपासून ही जागा भाजपाकडे असल्यामुळे आणि युतीच्या वाटाघाटीत पालघर लोकसभा शिवसेनेने हट्टहास करुन मागितल्याने भाजपाकडे पर्यायी कोणताच मार्ग मोकळा राहिलेला नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने पालघरच्या जागेवरच शिवसेनेने का अडून बसावे असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

त्यातच खासदार गवितांनी हाताला शिवबंधन बांधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. ही सर्व राजकीय खेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत करत असून ते बहुजन विकास आघाडीचे समर्थक आहेत, असा घणाघाती आरोप या बैठकीत उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी केला. राऊतांना पालघरच्या जागेसाठी शिवसेनेचाच उमेदवार का हवा आहे? असा प्रश्न ही यावेळी उपस्थित केला असून कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाणाचे बटन दाबून मतदान कसे करावे यासाठी आमचे मन मानत नाही. परंतु देशात पुन्हा भाजपाची सत्ता आणण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे येऊन नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला गवितांना मदत ही करावीच लागेल असे प्रतिपादन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले.

या बैठकीस प्रदेश कार्यकारणी सदस्य चंदूलाल घरत, समन्वयक मधुकर पाटील, प्रमोद आरेकर, अनिल शेलार, सुजीत पाटील, भूषण पाटील, उमेश सपकाळ, महावीर सोळंकी, शशांक राऊत, स्वप्नील किणी, विजय औसरकर त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापली खंत बैठकीत व्यक्त केली. त्यामध्ये खास करुन उल्लेखनीय बाब म्हणजे राजेंद्र गाविताना सेनेतून उमेदवारी देण्याऐवजी भारतीय जनता पक्षातूनच देण्यात यावी, त्यासाठी वरिष्ठांनी आमचं म्हणणं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवावं, अशी कळकळीची विनंती काही कार्यकर्त्यांनी उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांना केली.