Pune Rain : पुण्यात काल रात्री मुसळधार (Pune Rain) पाऊस झाला. या पावसात अनेक नागरिक अडकले होते. मंगळवार पेठेत पावसात अडकलेल्या एका मुलीला खांद्यावर घेऊन येतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. राजाराम केदारी तांडेल असं या मुलीची सुखरुप सुटका करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना पुण्याचा बाहुबली देखील संबोधलं जात आहे. 


अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम
मंगळवार पेठेतील स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटुंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळवताच तिथे अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील तीन लहान मुली, एक महिला आणि एक पुरुष अशा एकूण एकाच कुटुंबातील पाच जणांना सुखरुप बाहेर काढले. यामध्ये राजाराम तांडेल  यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोंढवा खुर्द भाजी मंडईलगत एका ठिकाणी सात नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. या सर्व सात जणांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करुन पाण्यामध्ये जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवानांनी उत्तम कामगिरी केली.


 






12 नागरिकांची सुखरुप सुटका


पुण्यातील 12 नागरिकांची या जवानांनी मध्यरात्री त्यांच्या घरातून किंवा इतर ठिकाणहून सुटका करुन आपलं कर्तव्य चोख बजावलं आहे. रात्री दहा वाजल्यापासून पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री दोन वाजेपर्यंत हा पाऊस संततधार पडत होता. त्यामुळे शहरातील अनेक परिसरांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. अनेकांच्या घरात मध्यरात्री पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागलं. 


घरात पाणी शिरलं अन् भिंत कोसळल्या


येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर, हडपसर गाडीतळ, शिवाजीनगर पोलिस मुख्यालय, मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, फिश मार्केट जवळ, कुंभार वाडा समोर, नारायण पेठ, मोदी गणपती, औंध, डिएव्ही स्कुल गल्ली, कसबा पेठ, पवळे चौक, कसबा पेठ, भुतडा निवास ,पर्वती, मित्रमंडळ चौक, गंज पेठ, भवानी पेठ या ठिकाणी घरात पाणी शिरलं तर 10 विविध ठिकाणी सीमा भिंत पडल्याच्या घटना देखील घडल्या होत्या.


हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर झाडपडीच्या घटना घडल्या होत्या आणि चंदननगर, बिडी कामगार वसाहत या ठिकाणी रिक्षावर झाड पडले होते. पाषाण, लोयला स्कूल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.