बीड : या वर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे संत भगवान बाबांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्यात आलं आहे.. एका भव्य चौथऱ्यावर पाण्यावर उभी असलेली भगवान बाबांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. दोन टन वजनाची ही मूर्ती फायबरपासून बनवण्यात आली आहे. स्मारकाच्या बाजूला ध्यान मंदिर आणि भव्य गार्डनही उभारण्यात येणार आहे.
या वर्षीच्या दसरा मेळाव्याचं खास आकर्षण म्हणजे हे स्मारक असणार आहे आणि हे स्मारक पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी येणार आहेत. भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर सावरगाव या भगवान बाबांच्या जन्मगावी गेल्या वर्षी पहिल्यांदाच दसरा मेळावा घेण्यात आला आणि या वर्षी देखील याच ठिकाणी दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. भगवान गडावरील दसरा मेळाव्यानिमित्त होणाऱ्या भाषणाला महंत नामदेव शास्त्री परवानगी नाकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. म्हणूनच या वर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी भगवान बाबांचे भव्य स्मारकाचं लोकार्पण केलं जाणार आहे.
सावरगावात गेल्या वर्षी पहिल्यांदाच दसरा मेळावा झाला तेव्हा पंकजा मुंडे यांनी या भव्य स्मारकाची घोषणा केली होती. एका वर्षाच्या आत हे स्मारक तयार होऊन या दसऱ्याला त्याचं लोकार्पण होणार आहे. 18 तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.