सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी स्वतःचा लॉगीन आयडी वापरुन विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात सखोल चौकशी केली असता, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठलाच हस्तक्षेप दिसून येत नसल्याचा अहवाल सत्यशोधन समितीने विद्यापीठ प्रशासनास सुपूर्द केला आहे. कुलगुरू यांच्यावरील आरोपात कोणतेच तथ्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे. काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कुलगुरूंच्या नावाचा बेकादेशीर लॉगिन आयडी वापरला आहे, असेही समितीने म्हटले आहे.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यावर स्वतःचा लॉगीन आयडी वापरून वि. गु. शिवदारे फार्मसी कॉलेजमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडून त्रिसदस्यीय सत्यशोधन समिती नेमून चौकशी करण्यात आली. या समितीच्या चौकशीत लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करण्याचे अधिकार एमकेसीएल, पुणे आणि विद्यापीठाचे यंत्रणा विश्लेषक पी. आर. चोरमले यांच्याकडे असल्याचे दिसून आले. तत्कालीन परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांच्या आदेशानुसार कुलगुरू यांच्या नावे एमफडणवीस या नावाने लॉगीन आयडी तयार करुन त्याच्या पासवर्डसह एमकेसीएलने 15 जानेवारी 2019 ला ईमेल केल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांना कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळे विद्यापीठातील परीक्षा विभागातील काही अधिकारी कुलगुरू यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे लॉगीन आयडी व पासवर्ड वापरत असल्याचे आढळून आले आहे.


कुलगुरुंच्या लॉगीन आयडीचा गैरवापर -

एमफडणवीस या लॉगीन आयडीद्वारे जानेवारी 2019 आणि जून 2019 या महिन्यात पाच परीक्षेच्या क्रमांकात बदल झाल्याचे आढळून आले आहे. बदल झालेल्या वेळी कुलगुरू डॉ. फडणवीस या प्रवासात आणि वेगवेगळ्या कार्यालयीन बैठकीत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरापासून परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी कुलगुरु यांना अंधारात ठेवून बेकायदेशीर काम केल्याचे या समितीने निदर्शनास आणून दिले आहे. विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी हा कटकारस्थान रचल्याचे दिसून आल्याचे सत्यशोधन समितीने म्हटले आहे. सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून याविषयी विद्यापीठाने अधिक चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे संयुक्तिक राहील, असे या समितीने म्हटले आहे. भविष्यामध्ये चुकीच्या, नियमबाह्य व बेकायदेशीर प्रकार घडू नयेत, यासाठी विद्यापीठाने उपाययोजना करताना संगणक कक्ष व सर्वर खोलीत त्वरित सी सी टी व्ही बसवून योग्य त्या सुरक्षा व उपाययोजनांचा वापर करून नियंत्रण ठेवण्याबाबत व कारवाई करण्यासंदर्भात समितीने शिफारस केले आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.

वाचा - सोलापूर विद्यापीठात आमदाराच्या नापास नातेवाईकाला पास केले, एनएसयुआयचा आरोप, कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी

Solapur University | आमदारांच्या नातेवाईकांचे गुण वाढवल्याचा सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंवर आरोप | ABP Majha