Satej Patil: गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग कशासाठी? ही आमची प्रमुख मागणी आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधामध्ये अनेक हरकती गेल्या असून या महामार्गाने कोल्हापूर, सांगलीला पुराचा फडका बसणार आहे. कोल्हापूर शहरातील 25 ते 30 वॉर्डमध्ये पाच ते दहा फूट पाणी वाढेल, अशी भीती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. शक्तिपीठ महामार्गाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, असा पुनरुच्चार सतेज पाटील यांनी केला. शेतकऱ्यांचे आंदोलन कायम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. सतेज पाटील म्हणाले की आमची आणि शेतकऱ्यांची भूमिका ठाम आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा मिळत नाही. 2024 मध्ये शिक्षकांचा जीआर काढून सुद्धा त्यांना सवलती मिळत नाहीत. मात्र शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे अशी विचारणा त्यांनी केली.  

Continues below advertisement

डाव्या संघटनांवर कारवाई होत असेल तर आमचा आक्षेप

जन सुरक्षा विधेयकावरून सध्या रणकंदन माजलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या संभ्रमावस्थेवरून सोशल मीडियामध्ये टीका होत आहे. या संदर्भात बोलताना सतेज पाटील म्हणाले की महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांसोबत या कायद्यासंदर्भात पाच बैठका झाल्या. त्यातील तीन बैठकांमध्ये आम्ही विरोध असलेल्या गोष्टी सांगितल्या होत्या. नक्षलवादाचा बिमोड झाला पाहिजे, त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. मात्र डाव्या संघटनांवर कारवाई होत असेल तर आमचा आक्षेप असल्यास ते म्हणाले. केंद्रीय मंत्री म्हणतायेत की 72 टक्के नक्षलवाद संपला. मात्र पोलिस आणि सीआरपीएफमुळे हा नक्षलवाद संपल्याचे त्यांनी सांगितले. 24 जुलै रोजी अंतिम बैठक होणार होती. मात्र ती 26 रोजी घेण्यात आली. 26 रोजी शाहू जयंती असल्याने ती बैठक 25 किंवा 29 ला घेण्याची विनंती घेणार होती. मात्र तत्पूर्वीच सभागृहामध्ये कायदा करण्यात आल्याचं पाटील म्हणाले. 

आता सीबीआय चौकशी करणार का?

मंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी पैशाची बॅग आढळून आल्यानंतर पाटील यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की शिरसाट यांचा  भयानक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये पैशाची बॅग स्पष्ट दिसते. याची सीबीआय चौकशी करणार का? अशी विचारणा केली. त्या बॅगेमध्ये पैसे दिसत असल्याचे संपूर्ण देशाने बघितलं आहे, पैशाचे गठ्ठे दिसत असल्याचे पाटील म्हणाले. मात्र ते जर कपडे आहेत म्हणत असतील तर याहून मोठा विनोद नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. शिंदे गटांच्या आमदारांमध्ये होत असलेल्या वादांवरून त्यांनी भाष्य केले, ते म्हणाले की ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याला भाजपचाच पाठिंबा आहे. आम्ही कितीही कायदा मोडला तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, हा आत्मविश्वास असल्यानेच अशी प्रकरणी पुढे येत असल्याची टीका पाटील यांनी केली. 

Continues below advertisement

पाशवी बहुमत मिळाल्याने गैरवापर

दरम्यान, विधिमंडळामध्ये मंत्री उपस्थित राहत नसल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की अनेक आमदार आपल्या मतदारसंघातील विषय सांगत असतात, पण आमदार काहीही बोलले तरी मंत्र्यांचे स्टॅंडर्ड उत्तर ठरलेलं असतं, असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. कॅबिनेट मंत्री नसल्याने सभागृह दोनवेळा बंद ठेवण्यात आल्याचेही पाटील म्हणाले. विधान परिषदेमध्ये दोन कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थित अनिवार्य असताना ती देखील उपस्थिती नसते, असे ते म्हणाले. आम्ही हे निदर्शनात आणून दिल्यानंतर कॅबिनेट मंत्री उपस्थित राहिल्याचे ते म्हणाले. पाशवी बहुमत मिळाल्याने सरकार याचा गैरवापर करत असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या