सातारा : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंची जीभ घसरली. 'मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार का?' असा प्रतिप्रश्न करत उदयनराजेंनी उपस्थितांना अवघडून टाकलं.

साताऱ्यातील कोरेगाव मधील 'डी पी भोसले कॉलेज'मध्ये उदयनराजे गेले होते. त्यावेळी एका विद्यार्थिनीने 'मुलं छेड काढतात' अशी तक्रार केली. 'मुलं पाठलाग करतात, मागे येऊन ओवरटेक करतात, मुली स्टँडवर थांबल्या, की गाडी लावून त्यांच्याजवळ उभं राहतात, त्यांना सारखं बघतात' असं गाऱ्हाणं तिने मांडली. मात्र उदयनराजेंनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच अवाक झाले.

'मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. मात्र ही गोष्ट नॅचरल आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण मुलं मुलींकडे बघणार नाहीत, तर काय मुलांकडे बघणार का?' असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी तक्रारदार विद्यार्थिनीला विचारला.

पाहा व्हिडिओ :


'याचा अर्थ असा नाही की कोणत्याही प्रकारची विकृती त्यांच्यात असली पाहिजे. ती विकृती जर असली तर आपण मला येऊन  सांगा. जातीने त्याच्यात लक्ष घालू, संबंधित व्यक्तीला समजून सांगण्याचं काम करु' असं उदयनराजे पुढे म्हणाले.

उत्तर ऐकून अवाक झालेली युवती काहीच न विचारता अवघडून खाली बसली. काही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या, तर बहुतांश तरुणांनी उदयनराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या.