Ladakh Road Accident: लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आज सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे.


दरम्यान, या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे 50 ते 60 फूट खोलवर श्योक नदीत पडले. सर्व 26 जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत 7 जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत.


22 मराठा लाईट इन्फण्ट्रीमध्ये सुभेदार होते विजय सर्जेराव शिंदे


या अपघात सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे शहीद झाले आहेत. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि जुळ्या मुली असं कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांचे दिड वर्षांपूर्वी निधन झाले. ते ही सैन्यात होते. पत्नी  आणि आईला याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नाही. गावात मात्र याबाबतची माहिती समजलेली आहे. विजय यांना तीन भाऊ असून विजय हे धाकटे होते. तर विजय यांचा थोरले बंधू प्रमोद हे आसाम येथे पॅरा कमांड म्हणून कार्यरत आहे. तर मधला भाऊ हणमंत नावाशिवा बंदरावर नोकरीला आहे. विसापूर या गावात प्रत्येक दोन घरा मागे एक जण सैन्यात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ladakh Road Accident: लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, 7 जवान शहीद


Uttarakhand Accident : उत्तरकाशीमधील अपघातात विदर्भातील दोन भाविकांचा मृत्यू


Palghar ST Bus Accident : पालघरमध्ये मद्यधुंद चालकामुळे एसटी बस दरीत कोसळली; 15 प्रवासी जखमी