सातारा: महाराष्ट्रातील काश्मीर अशी ओळख असलेलं महाबळेश्वर हे पार्टी करण्याचं ठिकाण बनत चाललंय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाने काल पोलिसांच्या मदतीने उच्चभ्रू पार्टीवर धाड टाकून कारवाई केली. महाबळेश्वरातील लिंगमळा धबधब्याच्या गेटवर तीन अलिशान गाड्या उभ्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या गाड्या थांबल्याने, वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. रात्री त्या परिसरातील तापमान हे 10 अंशांपर्यंत घसरतं. अशा थंडीत,गर्द झाडीत पर्यटक सहसा थांबत नाहीत. पण या गाड्या बऱ्याच वेळ थांबल्याने वनविभागाने चौकशीला सुरुवात केली.
रात्रीपर्यंत गाड्या थांबल्याने घात-पात झालाय की काय, अशी शंका आजूबाजूच्या रहिवाशांना आली. महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे, सुनिल बाबा भाटिया हे कार्यकर्त्यांसमवेत लिंगमळा परिसरात दाखल झाले. कडाक्याच्या थंडीत या जंगल परिसरात शोध सुरु झाला आणि काही अंतरावर जे काही दिसलं ते सर्वांना अचंबित करणार होतं. त्या ठिकाणी तीन मुलींसह 17 जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं. या सर्वांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या वाहनांमध्ये मद्यसाठाही आढळून आल्याने वाहनेही जप्त करण्यात आली.