सोलापूर: न्यायाधीशांनी जर मनावर घेतलं, तर कामं किती झटपट होऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण, पंढरपुरात पाहायला मिळालं.


विकासकामात अडथळ ठरत असणारं वकिलाचं बांधकाम, थेट जिल्हा न्यायाधीशांच्या मध्यस्थीने भुईसपाट झालं.

सध्या पंढरपूर शहरात रस्ते रुंदीकरणाचं काम सुरु आहे. मात्र रुंदीकरणावेळी  अनेक अडथळे येत आहेत. या रस्त्यामध्ये येणाऱ्या बाधित मालमत्तांचे वाद कोर्टात पोहोचले आहेत.

शहरातील अतिशय महत्वाचा मानल्या जाणाऱ्या भक्त निवास ते मध्य प्रदेश निवास या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र या मार्गावर असलेल्या एम टी नागाने या वकीलसाहेबांचं कंपाऊंड रस्त्यात येऊ लागल्याने काम रखडलं.

नागाने वकिलांनी त्याबाबत पंढरपूर न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे कामाला विलंब लागला.

या रस्त्याचे काम रखडल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात असुविधा आणि धुळीचा सामना करावा लागत होता.

ही बाब जिल्हा न्यायाधीश पी आर देशमुख यांच्या निदर्शनास आली. त्यांनी  ही केस मध्यस्थी केंद्राकडे मागवून घेतली आणि यातील फिर्यादी नागाने वकील आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कोर्ट चेंबरमध्ये बोलावून एकाच दिवसात या वादावर तोडगा काढला.

निर्णय होताच खुद्द जिल्हा न्यायाधीश वादी- प्रतिवादींसह जागेवर येऊन, त्यांनी त्यांच्या समक्ष ही भिंत जमीनदोस्त करायला लावली.

दस्तुरखुद्द वकिलांनीच आपली भिंत जिल्हा न्यायाधीशांसमोर पाडल्यावर, अन्य विरोधकांची हवाच निघून गेली.

न्यायाधीशांची सकारात्मक भूमिका असेल, तर फिर्यादी निष्णात वकील असला तरी गोडीगुलाबीने, समजुतीने कायदेशीर मार्ग निघू शकतात, आणि तातडीने निकाल लागू शकतात, हे या प्रकारावरुन दिसून येतं.

जिल्हा न्यायाधीश देशमुख यांच्या मध्यस्थीमुळे विकासकामं मार्गी लागलीच, शिवाय न्यायालयाचा वाया जाणारा वेळ, पैसा यांचीही बचत झाली.