कोल्हापूर: चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने फौन्ड्रीतील कर्मचाऱ्याचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. आदित्य दत्तात्रय जाधव असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.


आदित्य हा कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे इथल्या फौंन्ड्रीमध्ये काम करत होता. त्यावेळी सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने तो बेशुध्द पडला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी दुर्देवी मृत्यू झाला.

आदित्यचं दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो अतिग्रे इथल्या एका फौंन्ड्रीमध्ये कामाला जात होता. तो नेहमीप्रमाणे 3 सप्टेंबर रोजी रात्री ड्युटीवर गेला. मध्यरात्री तीनच्या सुमारास काम सुरु असताना आदित्य संबंधीत सुपरवायझरजवळ आला. यावेळी त्याने आदित्यच्या केसांवर, कपड्यांवर हवा मारत असताना, चेष्टेने प्रेशरने हवा गुदद्वारात सोडली.

यावेळी अचानक जोराचा धक्का बसून तो खाली कोसळला. ते पाहून सुरपवायझरने कोणताही गाजावाजा न करता त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु आदित्य निपचीत पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उजेडात आला. घटनेपासून संशयित सुपरवायझर गायब आहे.

आदित्य जाधव मध्यरात्री  बेशुध्द पडल्याने  कामगारांनी त्याला इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृत्ती गंभीर असल्याचे पाहून  डॉक्टरांनी त्याला कोल्हापूरला हलविण्यास सांगितलं. त्यानुसार नागाळा पार्क इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

आदित्य यापूर्वी कधीच अशा पद्धतीने चक्कर येऊन पडलेला नाही, त्यामुळे नेमकं काम करताना त्याला काय झालं याची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांनी कंपनीत असणाऱ्या सीसीटीव्ही पाहण्याची मागणी केली. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर आदित्यसोबत नेमकं काय झालं हा खरा प्रकार सर्वांसमोर आला.

शाहुपूरी पोलीसांनी कारखान्यातील संशयित सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांना ताब्यात घेतले आहे.