Satara: छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखं (Vagh nakh) अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून 19 जुलैला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार आहे. 


हिंदवी स्वराज्याच्या सातारा या चौथ्या राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये ही वाघनखं लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी विशेष दालनही उभारण्यात आलंय. 


विशेष विमानाने वाघनखं उद्या महाराष्ट्रात


लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखे भारतात कधी येणार ही प्रतीक्षा आता संपली असून गुरुवारी संध्याकाळी ही वाघनखं महाराष्ट्रात विशेष विमानाने आणली जाणार आहेत.


शुक्रवारी होणार भव्य दिव्य सोहळा


पुरातत्त्व विभागाच्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात येणार असून  शुक्रवारी 19 जुलै रोजी भव्य दिव्य सोहळा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  अजित पवार यांच्यासह राज्यातील इतर लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


वाघनखं भारतात आणण्यासाठी किती झाला खर्च?


वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 


वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.


लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवरायांची नाहीत?


लंडनहून आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh)  ही शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते.  त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनंही पुष्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं इंद्रजित सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय.. स्वतः इंद्रजित सावंतांनी ८ जुलै राेजी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.  


शिवरायांची वाघनखं निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात आणणार? 


काँग्रेस पक्षाला आजवर ही वाघनखं महाराष्ट्रात आणता आली नाहीत. भाजप सरकार निवडणुकीच्या तोंडावर ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणुकीत याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार का? पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. 


हेही वाचा:


Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...