सातारा : साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या सीआरपीएफ जवानांवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.


येत्या 24 फेब्रुवारीला खासदार उदयनराजेंचा वाढदिवस आहे. मात्र पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फलक साताराच नव्हे तर राज्यात कुठेही लावून नयेत, तसंच हार-पुष्पगुच्छ इत्यादी भेट देऊ नये, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

"पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला, याची कल्पना न केलेली बरी. देश एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपला आहे. भारतीय जवान देशासाठी वीरमरण स्वीकारत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्हाला वाढदिवसाचं औचित्य फार नाही. वाढदिवस येतील आणि जातील, पण आज जवानांच्या दु:खात सहभागी होता यावं, या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे," असं उदयनराजेंनी पत्रात लिहिलं आहे.



पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.