सातारा : खासदार उदयनराजेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. उदयनराजे भोसले एका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. राजघराण्यातील उदयनराजेंची जशी क्रेझ आहे, तसंच काहीसं उदयनराजेंनी बाईक रायडिंगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. शिवाय गाडीत काही वेगळं केलं असेल तरीही ते उदयनराजेंना दाखवायला येतात. असच काहीसं गुरुवारी (22 ऑक्टोबर) घडले.
उदयनराजे दुपारी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची सोडवत होते. त्यावेळी प्रतिक कांबळे नावाचा एक कार्यकर्ता जलमंदिरात त्याची स्वत:ची कावासकी 800 ही गाडी घेऊन जलमंदिरात घेऊन आला. राजेंना त्याने गाडी दाखवताना त्यांनी ही गाडी चालवून पाहावी असा त्याने आग्रह धरला. उदयनराजे तसे थोडे खुशच होते. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत ते बाईकवर स्वार झाले. त्यांनी पहिला गिअर उचलत गाडी स्टार्ट करत स्पीड वाढवला. जलमंदिरापासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत त्यांनी दोन राऊंड मारले. पण हे राऊंड काही साधे नव्हते. राजे खुश असल्यामुळे त्यांच्या गाडीने केव्हा शंभरच्या पुढ वेग गाठला समजलेच नाही. परंतु गाडीचा राऊंड मारताना मात्र त्यांच्या स्पीडने जलमंदिरातील उपस्थितांच्या छातीचा ठोका चुकला.
तसं तर राजकारणातल्या कोणत्याही पक्षात ते गेले की त्यांचा स्पीड असाच काहीसा असतो. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाडीच्या राऊंडमधून त्यांनी 'अभी तो मैं जवान हूं' असाच काहीसा संदेश सर्वांना दिला यात शंका नाही.