Motivational speaker Gaur Gopal Das : आजच्या पिढीत सर्वांना रिझल्ट लवकर पाहिजे असतात. त्यांना डोंगराच्या टोकावर पोहोचायचंय पण डोंगर चढायचा नाहीय. पिढी हुशार आहे यात वाद नाही, त्यांची स्वप्न चांगली आहेत मात्र त्यांना मेहनत न करता यश हवंय, असं गौर गोपाल दास यांनी म्हटलं आहे. अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते असा अद्भुत प्रवास असलेले गौर गोपाल दास आज माझा कट्टा कार्यक्रमात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

  


गौर गोपाल दास म्हणाले की,  आपण मशीन नाहीत आपण मनुष्य आहोत. त्यामुळं आपण प्रभावित होणारच. आपल्याला भावना आहेत, त्यामुळं आपल्यावर प्रभाव पडणारच. आयुष्य हे कभी खुशी कभी गम आहे. उद्या ही महामारी गेल्यानंतर आपण आनंदी होऊ. 


लोकांना मोटिव्हेट करण्यापेक्षा स्वत:ला मोटिव्हेट करा. आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगलो तर आपलं उदाहरण पाहून लोक मोटिव्हेट होतात. अध्यात्मिक झालो म्हणजे भावनांचा प्रभाव होत नाही असं नाही. कुठल्याही घटनेनंतर आपण पुन्हा नॉर्मल कसं होऊ शकतो हे महत्वाचं आहे, असं गौर गोपाल दास म्हणाले. 


गौर गोपाल दास म्हणाले की, आजच्या पीढीवर भगव्या वस्त्राचा प्रभाव नाही. तुमचे शब्द, तुमचं मार्गदर्शन त्यांच्याकडे योग्य मार्गानं जाणं गरजेचं आहे. ही मुलं ते शब्द, विचार घ्यायला तयार आहेत. वस्त्रांची मर्यादा नाही. लोकांनी माझ्या इमेजवर आक्षेप घेतला तरी मला फरक पडत नाही. 


आजच्या पीढीनं या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
ते म्हणाले की, माझ्याकडे सर्वात जास्त प्रॉब्लेम हे प्रेमप्रकरणाबद्दल येतात. प्रेमभंग झालेले अनेकजण माझ्याकडे येतात. आजच्या पीढीत सर्वांना रिझल्ट लवकर पाहिजे असतात. त्यांना डोंगराच्या टोकावर पोहोचायचंय पण डोंगर चढायचा नाहीय. पीढी हुशार आहे यात वाद नाही, त्यांची स्वप्न चांगली आहेत मात्र त्यांना मेहनत न करता यश हवंय. आयुष्यात संघर्ष असतो, फार युद्ध लढावी लागतात. अॅडजेस्ट न करणं, पेशन्स नसणं या पीढीच्या समस्या आहेत. तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळं पेशन्स संपले आहेत. झटपट काम करण्याचा एक अॅटीट्यूड तयार झाला आहे. मी मग त्यांना त्यांच्या भाषेत बोलून समजवावं लागतं. मी स्वत:ला त्यांच्याबरोबर येऊन संवाद साधतो. 


कोरोना काळात आपण एकटे नाहीत, आपण सर्व एकत्र आहोत


गौर गोपाल दास म्हणाले की, आपण निराश होऊ नये. लगेच यश नाही मिळालं तर हताश होऊ नये. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. यश मिळत नाही म्हणजे काही दिसत नाहीय मात्र तुमच्या प्रयत्नांनी त्या यशाची मुळं बळकट होत आहेत हे ध्यानात घ्या. सध्या परिस्थिती फार बिकट आहे. मात्र आपण एकटे नाहीत, आपण सर्व एकत्र आहोत. कोरोनानं कुणाचा अपवाद केलेला नाही, तो धर्मनिरपेक्ष आहे. तो राष्ट्रीयताही पाहात नाही, तो तुमचा सामाजिक, आर्थिक दर्जा पाहात नाही. मात्र यात एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण एकटे नाहीत. सध्या माणसांना मानसिक मदतीची गरज आहे. आपण जबाबदार राहणं फार गरजेचं आहे. आज मनुष्यत्व दाखवणं फार गरजेचं आहे.