सातारा : साताऱ्यातील कराडमधल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयात मुलींच्या स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे लावून चित्रीकरण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे चित्रीकरण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल झाल्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला.


महाविद्यालयात सोमवारी निर्भया पथकाची बैठक झाली. त्यावेळी एका विद्यार्थिनीने धाडसाने महाविद्याल्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर बाथरुममध्ये छुप्या पद्धतीने चित्रीत केलेल्या क्लीप असल्याचं सांगितलं. धक्कादायक म्हणजे, निर्भयाच्या बैठकीत ही माहिती देऊनही  पथकातील पोलिसांनी याबाबत दखल न घेताच दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.

याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाब विचारल्यावर चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र पोलिस ठाण्यात याची नोंद होणार नाही याची काळजी घेतल्याचा आरोप आहे.

केदार गायकवाड, हृषिकेश महाजन, युवराज मोरे आणि शुभम कानडे अशी निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थांची नावं असून प्राचार्य तक्रार देण्यासाठी कराड पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.