तरुणाचा लग्नासाठी तगादा, साताऱ्यात तरुणीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2018 11:17 PM (IST)
विवाह नोंदणीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करुन वारंवार त्रास देणाऱ्या तरुणामुळे अभियंत्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सातारा : संगणक अभियंता युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. विवाह नोंदणीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करुन वारंवार त्रास देणाऱ्या तरुणामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं. सातारा शहरातील आदित्य नगरीमध्ये किरण संकपाळ ही युवती राहत होती. किरणने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांनी तिचं नाव पुण्यातील एका विवाह नोंदणी कार्यालयात नोंदवलं. त्यावेळी त्यांनी तिचा मोबाईल नंबरही दिला होता. या माहितीच्या आधारावर बीड जिल्ह्यातील वैजनाथ परळीमध्ये राहणारा युवक अभिनव म्हस्के याने तिला संपर्क केला. लग्न करण्यासाठी अभिनवने किरणच्या मागे तगादा लावला. या त्रासाला कंटाळून संकपाळ कुटुंबाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती, मात्र पोलिसांनी त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. किरणला सोमवारी सकाळी पुन्हा अभिनवने फोन केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तिने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटणेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली असून संबधित आरोपी युवकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.