रत्नागिरी : पावसाचा जोर ओसरेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे आणि धरणांवर पर्यटकांना प्रवेशबंदी असेल. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मान्सून कालावधीत जिल्ह्यातील अनेक धबधबे, धरणांवर फक्त रत्नागिरीच नाही, तर इतर जिल्ह्यातूनही पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनासाठी येत असतात. यावेळी काही ठिकाणी पर्यटक बुडल्याच्या किंवा वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही जणांना प्राणही गमवावे लागले आहेत.
राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधब्यावर काल तेरा पर्यटक आले होते. धबधब्याच्या ठिकाणी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते अडकून पडले होते. रत्नदूर्ग माऊंटेनर्सच्या मदतीने सर्व पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली. अतिवृष्टीच्या कालावधीत अशाप्रकारे धबधबे आणि धरणांमध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय हवामान विभागाकडून जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टी विषयक इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार धूतपापेश्वर, सवतकडा, उक्षी, निवळी, मार्लेश्वर, पानवल, सवतसडा आणि जिल्ह्यातील अन्य धबधबे व धरणांवर पर्यटकांसाठी प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. नागरिकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी केलं आहे.