सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उद्यनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून उदयनराजेंना जामीन मंजूर करण्यात आला.

मारहाण आणि खंडणीप्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांना आज सकाळी अटक करण्यात आली होती. शासकीय विश्रामगृहात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार होतं. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून उदयनराजेंना कोर्टात हजर केलं नाही.

उद्योजकाला मारहाण आणि खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वीच फेटाळला होता. आज त्यांनी आज सातारा शहर पोलिस स्टेशनला हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंना अटक करण्यात आली.

दुसरीकडे, उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला आहे. तर उदयनराजेंच्या अटकेचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठानकडून उद्या सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं.

दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे.

संभाजी भिडे गुरुजींचा इशारा
“खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठी चाललेले प्रयत्न थांबवावेत. उदयनराजेंना अटक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला चिड निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यांची अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ”, असा इशारा संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला.

“उदयनराजेंवर केलेले आरोप घाणेरडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. उदयनराजे असं वागतील यावर परमेश्वरही विश्वास ठेवणार नाही. त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठं पाप होईल आणि त्यांनी ते करु नये”, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

खासदार उदयनराजे यांना अखेर अटक

अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची उदयनराजेंसोबत गळाभेट

उदयनराजेंना अटक झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : संभाजी भिडे गुरुजी

कोल्हापूरच्या संभाजीराजेंचा उदयनराजेंना पाठिंबा!

खा. उदयनराजेंवर कारवाई होणारच : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

हजारो समर्थकांसह उदयनराजेंचं साताऱ्यात शक्तीप्रदर्शन

उदयनराजे भोसले पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड

उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला