Amravati Violence : अमरावतीकरांना आजपासून संचारबंदीतून मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरात आजपासून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. 


अमरावती शहरात घडलेल्या हिंसक घटनांच्या अनुषंगानं लागू करण्यात आलेली संचारबंदी आता केवळ रात्रीच राहणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या आदेशानुसार, 23 नोव्हेंबरपासून म्हणजेच, आज सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत शहरात संपूर्णपणे संचारबंदीत सूट देण्यात आली होती. रात्री 9 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे पूर्वी दिलेल्या सवलतीही कायम राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. जातीय दंगलींनंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि संदेश पाठविण्याऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. यासंदर्भात विविध पोलीस ठाण्यांत आतापर्यंत सात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ किंवा संदेश पाठवू नये, असं आवाहनही पोलीस विभागानं केलं आहे. आतापर्यंत 55 गुन्हे दाखल झाले असून एकूण 312 जणांना अटक करण्यात आली आहे.


अमरावतीत संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना 800 कोटींचा फटका?


अमरावतीत हिंसाचारानंतर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळं शहरातील व्यापार-उद्योगांची तब्बल 700 ते 800 कोटींची उलाढाल थांबलेली आहे. इंटरनेट सेवा बंद आहे, त्यामुळे बँकिंग सेवाही बंद असल्यामुळं व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला असल्याची माहितीही महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 


दरम्यान, त्रिपुरातील (Tripura Violence)घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले. यात अमरावतीमध्ये वातावरण खूप तणावाचे झाले होते. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.अमरावतीत निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होती. मोर्चादरम्यान अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली होती. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंदही पुकारण्यात आला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Amravati Voilance : हिंसाचार... निर्बंध... अन् शिथीलता; अमरावतीत संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना 800 कोटींचा फटका?