Satara District Bank Election 2021 : पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 11 जागा बिनविरोध निवडून आल्या तर 10 जागांवर झालेल्या मतदानाची मोजणी आज पार पडतेय. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचं पॅनल आहे. तर महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत.


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 21 जागांसाठी ही लढत असताना यातील 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरीत दहा जागांसाठी झालेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. यात माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या होम पिचवरच त्यांच्या विरोधात त्यांचाच कार्यकर्ते असलेले ज्ञानेश्वर रांजणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. या दोघांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव होणार, अशा चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. 


पाहा व्हिडीओ : ... त्यावेळी भाजपनं 100 कोटींची ऑफर दिली होती; शशिकांत शिंदे



सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 'या' जागा बिनविरोध


सातारा जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध झाल्या. रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, अनिल देसाई, सुरेश बापू सावंत, लहुराज जाधव, आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे आणि शिवरुपराजे खर्डेकर यांचा समावेश आहे.


दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. सातारा आणि सांगली जिल्हा बँकेसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. सातारा जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध निवडून आल्या तर 10 जागांसाठी मतदान झालं. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो अशी चर्चा होतीच. शिंदेंविरोधात उभे असलेल्या ज्ञानदेव रांजणे यांना शिंदेंच्या विरोधकांनी ताकद दिल्याची चर्चा होती. तर तिकडे सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचं सहकार विकास पॅनल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनल अशी थेट निवडणूक झाली. पण क्रॉस वोटिंग झाल्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बँकांच्या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही; शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंना इशारा