सातारा : प्रेम जुळवूण कुंडली जुळवणं आणि कुंडली जुळल्यानंतर दिलेल्या परीक्षेचे मार्क जुळणं, हे थोड अतिच होतंय ना? हो पण असं घडलय. साताऱ्यातील सांगवड आणि गणेवाडी गावातील प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याच्या जीवनात. प्रेम करुन कुंडली जुळवत लग्न करणाऱ्या या नवदाम्पत्याना बारावीच्या निकालात सेम टू सेम मार्क मिळालेत.

Continues below advertisement


सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील आदिक कदम आणि पाटण तालुक्यातीलच सांगवड गावातील किरण सुर्यवंशी या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. मुलगी बारावीत तर मुलाने 11 वी मधूनच शिक्षण थांबवले होते. या दोघांच्या प्रेमामध्ये एक दरी तयार झाली होती. मुलीने मुलाला अट टाकली तू बारावीची परिक्षा दे तरच मी तुझ्याशी लग्न करेन. मुलाने नाय हो करत होकार दिला. आणि बाहेरून बारावीचा फॉर्म भरला. मुलाने बारावीचा फॉर्म भरल्यामुळे मुलगी खुष झाली आणि दोघांचे प्रेम आणखीनच घट्ट झाले. फिरण बोलणं आणि सारखा हातात मोबाईल, यामुळे घरापासून ते गावाच्या त्या टोकापर्यंत या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाली.


कुंडली चक्क 31 गुणांनी जुळली
मुलाचे शिक्षण आणि मुलाच्या आणि मुलीच्या वयातील फरकामुळे तर घरातल्यांकडून रेड सिग्नल. घरातल्यांच्या विरोधामुळे दोघांनीही परीक्षेनंतर प्रेमविवाह करायचेच असे ठरवले. परीक्षा झाली आणि कोरोनाचं भल मोठ संकट समोर ठाकलं. लॉकडाऊनमुळे दोघही थोडे थांबले. परंतु, दोघांनीही घरातल्यांची समजूत काढायला सुरुवात केली. मुलगी चार दिवस जेवली नाही तर मुलगाही चार दिवस उपाशी. अखेर घरातल्यांनी होकारा दिला. मात्र, घरातल्यांनी प्रेमासमोर दुसर संकट उभ केलं. दोघांच्या घरातल्यांनी कुंडलीचा विषय काढत कुंडली जुळली तरच लग्न लावून देतो असा अट्टाहास धरला. आता बिनकुंडली बघता केलेलं प्रेम हे कुंडलीत जाऊन अडकू शकते असे वाटत असताना ज्योतिष शास्त्राकडे जन्मपत्रिका ठेवल्या. आणि दोघांच्या आनंदाचा एक क्षणच म्हणावा. कुंडली चक्क 31 गुणांनी जुळली. दोघांच्या आनंदाचा पाराच उरला नाही. आणि दोन्ही घरातील संमतीने लॉकडाऊनमध्येच म्हणजे 14 मेलाच दोघांचा विवाह थाटामाटात झाला.


क्रिकेटच्या मैदान गाजवणारी रसिका शिंदेने बारावीच्या परीक्षेत मारली बाजी


लॉकडाऊनमध्येही हे नवदाम्पत्य कोरोनाला विसरुन गावभर फिरत होते. या दोघांची परीक्षेपासून ते लग्नाच्या स्टेजपर्यंत आणि स्टेजपासून ते लग्नानंतर ही सारखा एकच विषय, दोघांपैकी कोणाला जास्त गुण मिळणार. त्यात निकालाच्या तारखा मागंपुढं. दोघांचाही जीव खालीवर. अखेर निकालाची तारीख ठरली. आणि निकालाचा दिवस उजाडला. एक वाजता दोघांनी एकत्र बसून पहिल्यांदा किरणचा निकाल पहाण्याचं ठरवलं. निकाल बघितला तर फक्त 323 मार्क. कमी पडलेले मार्क बघून किरण नाराज झालीच शिवाय घरातले सर्वजण. नंतर आदिकचा निकाल उघडला. आदिकलाही 323 मार्क. हे अस कसं म्हणत दोघांचेही मार्कलिस्ट चार-चार वेळा ओपन करुन पाहिले. मात्र, कशाच काय दोघांचे मार्क सेमच होते.


एकमेकाला हिणवू शकतो अशा अविर्भावात असलेल्या दोघांनी सेम टू सेम गुण मिळवले होते. या नवदाम्पत्याचा हा योगायोग म्हणजे या दोघांच्या कमी मार्क पडलेल्याच्या दु:खावर पाणीच म्हणाव लागेल. कारण हे दोघच काय पण दोघांच्या आई-वडिलांना सुध्दा भारीच वाटले. आणि मंग काय या दोघांच्या मार्कची चर्चा गावभर सुरु झाली. आनंदाला पाराव उरला नाही. या दोघांचे मार्कलिस्ट आणि दोघांच्या लग्नाची गोष्ट सोशलमिडीयावर चांगलीच व्हायरल झाली.


प्रेमानंतर कुंडली जुळणं आणि आता परीक्षेतही एकमेकाचे मार्क जुळणं हा खर तर योगायोग मानला जात असला तरी या नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी हा योगायोग नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही.


Maharashtra HSC Results 2020 | बारावीच्या निकालाची विभागवार आकडेवारी