सातारा : चाऱ्यामध्ये लपवून ठेवलेलं मंगळसूत्र चुकून म्हशीने खाल्ल्याचा प्रकार साताऱ्यात घडला. सुदैवाने डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन मंगळसूत्र बाहेर काढलं, त्याचप्रमाणे म्हैसही सुखरुप आहे.


साताऱ्यातील खटाव तालुक्यात राहणाऱ्या सुनिल दादासो खाडे यांची नवविवाहित मुलगी साधना रक्षाबंधन सणासाठी माहेरी आली होती. गावात चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याने रात्री झोपताना तिने स्वतःचे दागिने जनावरांच्या चाऱ्याजवळ ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीच्या वडिलांनी पोत्यातील पेंड म्हशीला चरायला दिली. त्यामध्ये मुलीने ठेवलेले दागिनेही म्हशीसमोर पडले. त्यातला नेकलेस म्हशीने चघळून खाली टाकला, परंतु पाच तोळ्यांचं गंठन तिने गिळलं.

ही बाब वडिलांच्या लक्षात येताच म्हशीला पशुवैद्यांकडे नेण्यात आलं. वडुज पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक उपायुक्त डॉ. नितीन खाडे आणि त्यांच्या टीममधील डॉ. तानाजी खाडे, डॉ. प्रकाश बोराटे आणि साबळे यांनी यशस्वीरित्या ऑपरेशन करुन पाच तोळ्यांचं मंगळसूत्र बाहेर काढलं. त्याचप्रमाणे तिने आधी गिळलेली चप्पल, फोनची वायर आणि प्लास्टिकच्या पिशव्याही बाहेर काढल्या.