अमरावती : एकतर्फी प्रेमातून अमरावतीत 19 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला  झाला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या बजरंग चौकात रविवारी दुपारी ही घटना घडली. हल्ला करणाऱ्या युवकाला शस्त्रानिशी पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली.



पीडित तरुणी अमरावतीच्या भारतीय महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तरुणी मैत्रिणीसोबत शिकवणीवर्गातून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी अक्षय कडूने पीडित तरुणीला रस्त्यात गाठलं आणि तिच्याशी वादावादी सुरु केली.


त्यानंतर चिडलेल्या अक्षयने पीडित तरुणीला रस्त्यावर पाडलं आणि धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. पीडित तरुणी मदतीसाठी ओरडत असताना कोणीही तिच्या मदतीला पुढे आले नाही. अखेर पीडित तरुणीच्या मैत्रीणीने आरडाओरड केल्याने जवळच असलेले पोलिस घटनास्थळी दाखल झाले.


पोलिसांनी आरोपी अक्षयला घटनास्थळावरून अटक केली आणि जखमी तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल केलं. तरुणीची परिस्थिती गंभीर असून उपचार तिच्यावर सुरू आहेत.


आरोपी अक्षय पीडित तरुणीचा अनेक दिवसांपासून पाठलाग करत होता. तरुणीच्या आई-वडिलांनी अक्षयच्या नातेवाईकांकडे आणि पोलिसात याबाबत तक्रार केली होती. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील केली होती. अक्षय हा पीडित तरुणीचा लांबचा नातेवाईक असून चार वर्षापासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.


अमरावती शहरात मागील वर्षी साईनगर परिसरात प्रतीक्षा मेहत्रे हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. आजच्या या घटनेने प्रतीक्षा मेहत्रे हत्याकांडाच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.