बुलढाणा : सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना कोरोनानं विळखा दिला आहे. अशातच झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळं खळबळ उडाली आहे. एका सर्पमित्रानं चक्क उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या परिसरात विषारी साप आणून सोडले. दरम्यान, सर्पमित्रानं असं का केलं? यामागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 


बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या आजुबाजुच्या परिसरात एका सर्पमित्रानं पकडून आणलेले 6 ते 7 विषारी साप सोडल्यानं परिसरात आणि कोविड रुग्णालयाच भितीचं वातावरण पसरलं आहे. शहरात कुठेही साप आढळला की, त्या पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलावलं जातं. सर्पमित्र म्हणजे, सापांचा मित्र. मानवी वस्तीत कुठेही साप आढळला तर या व्यक्ती तो साप पकडून त्याला सुखरुप जंगलात सोडतात. पण बुलढाण्यातील सर्पमित्राने केलेलं कृत्य खरंच विचित्र आहे. मलकापुरातील अकरम नावाच्या सर्पमित्राने पकडलेले विषारी साप चक्क रुग्णालय परिसरात सोडल्यानं भितीचं वातावरण पसरलं आहे. 


मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी या सर्पमित्राला हे कृत्य करताना पाहिलं आणि त्याला अडवण्याता प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांकडून अडवणूक झाल्यामुळे या सर्पमित्रानं काही साप पकडून नेले. पण रुग्णालय परिसरात त्यानं विषारी साप आणून का सोडले, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मलकापुरातील या कोविड सेंटर परिसरात अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच अनेक प्रजातीचे साप आढळून येतात. त्यावेळी सर्पमित्रांना बोलावून ते साप पकडून त्यांना सुखरुप जंगलात सोडण्यात येतं. पण सर्पमित्रानं स्वतः रुग्णालय परिसरात आणून साप सोडल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :