कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघासाठी आज जिल्ह्यातील ठरावधारकांनी चुरशीनं मतदान केलं. कोरोनाचं संकट असतानादेखील ही निवडणूक पार पडली. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. "जवळपास 2,280 मतदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे गोकुळ दूध संघ व्यापाऱ्यांचा हातातून शेतकऱ्याच्या हातात जाईल", असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. "आमचे संपूर्ण पॅनेल निवडणूक येईल", असंही ते म्हणाले. करवीर तालुक्यातील आपल्या मतदारांसोबत स्वतः पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
Kolhapur Gokul Doodh Sangh Election : कोरोनाच्या सावटात गोकुळ दूध संघासाठी मतदानाला सुरुवात
गोकुळ महासंघाच्या निवडणुकीबाबतीत सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार पी एन पाटील यांनी हा संघ शेतकऱ्यांच्या हातातच आहे, असं प्रत्युत्तर दिलं. कोणत्याच व्यापार्यांच्या हातात गोकुळ दूध संघ गेला नाही, हा दूध संघ गेली 30 वर्षे शेतकऱ्यांच्या हातामध्येच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, केवळ मतदानासाठी जात नाही", असा टोला देखील पी एन पाटील यांनी सतेज पाटील यांना लगावला. काही संचालक विरोधकांकडे गेले असले तरी काही फरक पडणार नाही. सत्ताधारी पॅनेल पुन्हा एकदा निवडून येईल असा विश्वास देखील पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 70 मतदान केंद्रांवर ही दूध संघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर एकावेळी जवळपास 50 ते 55 मतदार मतदान करू शकतील असे नियोजन करण्यात आले होते. मतदानादरम्यान ठरावधारकांची एकच गर्दी पाहायला मिळाली.
करवीर तालुक्यातील मतदान कोल्हापुरातील महाविद्यालयात प्रवेशद्वारावर एकाच वेळी सगळे ठरावधारक आले, त्यामुळे मतदान केंद्रावर तुफान गर्दी झाली. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 3,650 मतदार होते. निवडणुकीदरम्यान त्यातील तीन मतदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्यक्षात 3,647 ठरावधारकांनी मतदानाचा हक्क बजावला. ठरावधारकांपैकी आतापर्यंत एकूण 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या त्या सर्व मतदारांनी शेवटच्या एक तासामध्ये मतदान केलं. विशेष म्हणजे प्रत्येक मतदाराची मतदान केंद्राबाहेर तपासणी करण्यात आली. या मतदान प्रक्रियेसाठी तब्बल 385 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी 4 तारखेला होणार आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघ पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांच्याच ताब्यात राहणार की मतदार सतेज पाटलांची साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.