सातारा: साताऱ्यातल्या वाईमधील हत्याकांडाप्रकरणी आरोपी डॉ. संतोष पोळनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वनिता गायकवाडचा मृतदेह धोम धरणात फेकला नसल्याची माहिती पोळनं पोलिसांना दिली. वनिता गायकवाडचा मृतदेह फार्म हाऊसच्या परिसरातचं असल्याचंही त्यांनं सांगतिलं.

 

दरम्यान, पोळच्या गावात जाऊन एबीपी माझानं त्याच्याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पोळचं बालपण ज्याठिकाणी गेलं, त्या धोममधल्या घरी आमचे प्रतिनिधी पोहोचताच, संतोष पोळच्या लहान भावानं पळ काढला.

 

धोममधील गावकऱ्यांना संतोष पोळविषयी प्रचंड तिरस्कार असल्याचंही दिसून आलं. तर डॉक्टरी पेशाचा पोळनं चुकीचा वापर केल्याचं त्याचे मित्र आणि गावकरी सांगतात.

 

क्रूरकर्मा डॉक्टर संतोष पोळच्या फार्म हाऊसवर आणखी दोन खड्डे आढळून आले आहेत. सहा जणांची हत्या केल्यानंतर डॉक्टर पोळचा पुढचा निशाणा खुद्द त्याची नर्स असल्याची माहिती पुढे आली आहे.
नर्सच्या हत्येचा बेत आखण्याआधीच डॉक्टर संतोष पोळनं हे दोन खड्डे खणून ठेवले होते. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान वाई परिसरातील आणखी नऊ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

 

कसा लागला सुगावा ?

 

13 वर्षात 6 खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. 16 जून 2016 ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.

 

 

कोणाच्या हत्या ?

 

 

साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळने एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. हत्या झालेले सहाही जण 2003 ते 2016 या कालावधीत सातारा आणि वाई परिसरातून बेपत्ता होते. यापैकी चार मृतदेह हे डॉ. संतोष पोळच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले होते.

 

 

कसं झालं हत्यांचं प्लॅनिंग ?
संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप


 

 

13 वर्षात संतोषशी संबंध आलेल्या 5 महिला बेपत्ता झाल्या. पोलिसात तशा तक्रारी आल्या. पण तपास लाल फितीत अडकल्यानं संतोष पोळ मोकाट होता. पोलिसांच्या दाव्यानुसार हत्यांमध्ये फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाणीचाच संबंध आहे. त्यामुळे 5 हत्यांशिवाय संतोषनं आणखी काही लोकांचाही गळा घोटलाय का? याचाही तपास सुरु आहे.

 

 

स्वत:ला डॉक्टर म्हणवणाऱ्या संतोषचा कारभार सुरुवातीला एका पडक्या घरातून चालायचा. माती आणि पत्र्याचं घर. धोमचा परिसर थोडा आडवळणाचा, त्यामुळं कुणी आजारी पडलं तर आजूबाजूच्या गावांमधील लोकांना संतोष पोळचाच आधार होता आणि त्याचाच फायदा संतोष घ्यायचा.

 
महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.

 

 

मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली


 

 

थंड डोक्याचा आणि क्रूर मानसिकतेच्या संतोषचं धाडस इतकं की त्यानं अगदी घराच्या बाजूलाच एक मृतदेह पुरला होता. संतोषच्या डॉक्टरकीच्या डिग्र्या किती खऱ्या आहेत, याचाही शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पण महिलांना मृत्यूचा घाट दाखवण्यासाठी त्यानं भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषधच हत्यार म्हणून वापरलं.