सोलापूर : राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सोडवण्यात यश आलं आहे. माढ्यातून भाजपाच्या समर्थनाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली.


माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र एकाच कुटुंबातून अनेक सदस्य नको आणि नातू पार्थ पवारांना निवडणुकीत नशिब आजमावता यावं, यासाठी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर माढ्याचा तिढा सुटता सुटत नव्हता.

मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. मात्र आता संजय शिंदेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे.

संजय शिंदे यांनी मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली याबद्दल मी आभार मानतो, असं संजय पाटील म्हणाले. सकाळी माझा प्रवेश होणार अशा बातम्या येत होत्या. मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेसपासून लांब गेलोच नव्हतो. शरद पवार यांनी मला नेहमी मदत केली आहे. मागे काही गोष्टी घडल्या त्यामुळे मी पक्षापासून लांब झालो होतो. त्याबाबतीत मी शरद पवार यांना पत्र लिहून कळवलं होतं, असं शिंदे म्हणाले. काही लोक भाजपमध्ये गेलेत ते लोकहितासाठी नाही तर स्वताच्या फायद्यासाठी, असा नाव न घेता रणजितसिंह मोहिते-पाटील यांना संजय शिंदे यांनी टोला लगावला.

कोण आहेत संजय शिंदे?
- शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
- माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
- निमगाव 'टेंभुर्णी'च्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात
- 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव
- जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.
- पालकमंत्री विजय देशमुख यांच्या मदतीने अध्यक्ष झाले.
- म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष.
- माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन - जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवलं.

शरद पवार यांचे भाषणातील महत्वाचे मुद्दे

* आम्ही विजयसिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या भानगडीत पडणार नाही.


* त्यांनी ज्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. ते पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे आम्ही स्वच्छपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.


* मी सहकार्यांचा सन्मान करतो. मोहिते-पाटील यांना राज्याच्या साखर संघाचे अध्यक्ष, देशाच्या साखर संघावर प्रतिनिधित्व दिले. पण त्यांच्या मनात काही वेगळा विचार आला.


* आम्हाला उमेदवारांची कमतरता नाही. भाजपने असं ठरवलेलं दिसतंय की बाहेरच्या लोकांना उमेदवारी द्यायची. आधी हा पक्ष काही विचारांची बांधिलकी मानायचा, आता तसं काही राहिलेलं नाही.


* आज तरी मला वाटत नाही की एनडीएचे सरकार येईल.


* मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या. जाणकारांच्या मते यावेळी त्यातील 40-45 जागा कमी होतील.


* मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधे मागील वेळी कॉंग्रेसला खूप कमी झाल्या होत्या. यावेळी या तीन राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. तीथं भाजपच्या अर्ध्याहुन जागा कमी होतील.


* त्यामुळे उत्तर भारतातच भाजपच्या 80-90 जागा कमी होतील.


* चंद्रकांत पाटील कधीही लोकांमधून निवडून गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला लोक किती महत्त्व देतील याबद्दल शंका आहे.

* सर्व महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी वारंवार एअर स्ट्राईकचा उल्लेख करतात.


* पार्थ पवारला भाषणाबाबत काहीही सल्ला देणार नाही. सुरुवातीला ठेचा लागतात. नंतर आपोआप मार्ग सापडतात.


* कोल्हापूरमधून सतेज पाटील यांना विधानसभेवर निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं पुर्ण ताकदीने प्रयत्न करेल.


* गिरीश कुबेर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे आणि एक लेखातही लिहिलं आहे की मनोहर पर्रिकर दिल्लीत राफेलबद्दल जे झालं त्यामुळे नाराज होते. जितेंद्र आव्हाड यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केलं असावं.