मुंबई : 'सामना' दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर शिवसेनेकडून किंवा सामना दैनिकाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी फेसबूकवर सूचक पोस्ट केली आहे.

'इरादे मेरे हमेशा साफ होते है, इसलिए कई लोग मेरे खिलाफ होते है' अशा आशयाचा मजकूर त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचं आहे, याची चर्चा सुरु झालीय.

संजय राऊत अनेक वेळा पेचाच्या विषयांवर माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देतात. यावेळी मात्र त्यांनी दोन दिवसांनंतरही मौन बाळगणं पसंत केलं आहे.

‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक


शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.  नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली


दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

'सामना'तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र


शिवसेनेचे भोकरदन तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी तालुकाप्रमुख आणि बाजार समिती संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करुन पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देऊन ‘सामना’चा निषेध व्यक्त केला आहे.

‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे


श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी ‘सामना’च्या वर्तमानपत्रात रेखाटलेलं व्यंगचित्र छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं, असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. वर्तमानपत्रात काय छापावं आणि काय छापू नये, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अखत्यारित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे


मराठा मूक मोर्चाबाबत ‘सामना’ने जे व्यंगचित्र छापलं, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील


‘शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी.’ अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

सामना’ कार्यालयांवर झालेली दगडफेक ही ‘सामना’च्या व्यंगचित्रातून झालेल्या अवमाननेविरोधात मराठा समाजाच्या संतापाचे प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘सामना’च्या व्यंगचित्रामध्ये मराठा मोर्चासह सर्वच समाजातील महिलांचाही अवमान करण्यात आल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला आहे.