मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडाला आज एक वर्षं पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी बंडाळी पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केले. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, या मागणीचे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना लिहिले आहे.  


काय म्हणाले संजय राऊत पत्रात?


20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.  एका आमदाराने यासाठी 50 खोके (50 कोटी) रुपये घेतले त्यामुळे  20 जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने  जाहीर केल्यानंतर 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा,  असं संजय राऊत म्हणाले. 




शिवसेना आजचा दिवस  स्वाभिमान दिन, ठाकरे गट जागतिक खोके तर राष्ट्रवादी गद्दार दिन म्हणून साजरा करणार


शिवसेना आजचा दिवस  स्वाभिमान दिन साजरा करणार आहे तर ठाकरे गट जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. तर आदित्य ठाकरेंनी आजचा दिवस जागतिक खोके दिवस साजरा करावा असे आदेश दिले आहे.  वर्धापन दिनाच्या दिवशी गद्दारीवरुनही उद्धव ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलंय. कालच्या राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरेंनी बंडावरुन शिंदेंवर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचं म्हणत शिंदे-फडणवीसांनी पलटवार केलाय.


शिवसेनेचा कालचा वर्धापन दिवस  तापवला तो आरोपांच्या त्रिकोणाने. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदे, फडणवीस, मोदी आणि अमित शाहांवर टीकेची झोड उठवली तर, तिसरीकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरलंय. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले. एक ठाकरेंचाआणि दुसरा शिंदेंचा...ठाकरेंचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला तर शिंदेंचा मेळावा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.. याचबरोबर आरोप-प्रत्यारोपांनाही ऊत आला. तर कल्याणमधील भाजपच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला..