Rajesh Kshirsagar : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आहे. संजय राऊत, विनायक राऊत हे कान फुकरे नेते असून माझ्याबाबतही त्यांनी उद्धवजींचे कान फुंकल्याचा आरोप केला.
क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलेच टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, प्रत्येक गटात एकनाथ शिंदे असतात म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी प्रत्येक पक्षात कान फुकरे संजय राऊत, विनायक राऊत असतात हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. क्षीरसागर यांनी आव्हाड यांच्यावरही टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणजे नाटक कंपनीतील कलाकार आहेत. त्यांनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटकात काम करावं. खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची वृत्ती असून काहीही करून चर्चेत राहायचं हा आव्हाड यांचा उद्योग असल्याचा टोला यांनी लगावला.
पोलिस कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड राज्य सरकारवर आरोप करत आहेत. आव्हाड यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यावर केलेल्या आरोपांचा क्षीरसागर यांनी समाचार घेतला. पोलिस विनाकारण गुन्हे दाखल करत नाहीत आणि न्याय मागण्यासाठी कोर्ट असल्याचे ते म्हणाले.
तीन दिवसांचे भाडे घेण्याचा निर्णय रद्द; राजेश क्षीरसागर यांची माहिती
दरम्यान, सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीकडून तीन दिवसांचे भाडे घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. या निर्णयाने भाविकांना फक्त जाता-येताचे 370 किलोमीटरचेच भाडे द्यावे लागणार आहे. यापूर्वी या यात्रेसाठीचा खोळंबा आकार पूर्ण माफ केला आहे. पण या वर्षी एस.टी. महामंडळाने एसटी भाड्यापोटी 370 किलोमीटरने तीन दिवसांचे भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाडे प्रति किलोमीटर 54 रुपये धरले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भक्तांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार होता.
याविषयी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ परिवहन आयुक्त शेखर चेन्ने यांना फोन करून आदेश दिले. त्यानुसार तीन दिवसांच्या यात्रेसाठी कोल्हापुरातील भाविकांच्याकडून आता 370 किलोमीटरचे भाडे आकारणी होणार आहे. त्यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे.
सौंदत्ती यात्रा 8डिसेंबर रोजी होत आहे
इतर महत्वाच्या बातम्या