Mayur Shinde : संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. गोवंडी परिसरातून दहा तारखेला रिजवान जुल्फिकार अन्सारी आणि शाहिद अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याच परिसरातून आकाश पटेल याला अटक करण्यात आलेली आहे, या तिघांकडून मिळालेल्या माहितीवरून 13 तारखेला मुन्ना शेख याला ठाण्यातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 तारखेला मयूर शिंदे हा पाचवा आरोपी गजाआड झाला. आज मुन्ना शेख आणि मयूर शिंदे या दोघांना मुलुंड न्यायालयात हजर केले. या आरोपींना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मयूर शिंदे याचा या संपूर्ण प्रकरणात नेमका काय रोल होता याचा तपास आता या पुढील काळात कांजूर पोलीस करणार आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांना धमकीप्रकरणात अटक असलेल्या मयुर शिंदे हा व्यक्ती चर्चेत आहे.
मयुर शिंदे याला अटक होताच त्याचं कनेक्शन राऊतांशीच जोडलं गेलं कारण मयुर शिंदे हा सुनिल राऊतांचा जवळचा मानला जायचा. मयुर शिंदे भाजपमध्ये होता.. कधी शिवसेनेत होता... अहो तो कधी राष्ट्रवादीत होता... छे छे तो तर शिंदे आणि भाजपमध्ये आहे... सध्या असा सगळा घोळ सुरु आहे. त्यामुळे हा बनाव नेमका कोणी रचला ? का रचला ? याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
जसे ऋतू बदलतात तसे मयुर शिंदे या महाशयांनी पक्ष बदलेले आहेत. कधी भाजप कधी शिवसेना तर कधी राष्ट्रावादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशाचे फोटो यांच्या फेसबुक पेजवर आहेत. काहीच दिवसांपूर्वी सुनील राऊत यांच्या फोनवर फोन आला आणि सकाळचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या घालेन अशी धमकी दिली. या प्रकरणाची ॲाडिओ क्लिपही व्हायरल झाली. पोलीसांनी धागेदोरे शोधायचा प्रयत्न केला, शेवटी कधीकाळी सुनिल राऊतांचा राईट हॅन्ड म्हणून कामकरणा-या मयुर शिंदेच पोलीसांच्या हाती लागला. त्यानंतर सुरु झाला महाराष्ट्रांच्या राजकारणातला नवा क्लायमॅक्स ….!!!!
मयुर शिंदे आहे तरी कोण ?
मयूर शिंदे पिल्ले गॅंगचा माणूस मानला जायचा. भांडुप येथील रियल इस्टेट धंद्यातील विकासक वैभव कोकाटे याच्यावर ४/११/२०११ मध्ये फायरिंग केली होती. पोलीस अधिकारी याला शिवीगाळ केल्याने १९ मार्च, २०१६ मयूर शिंदे याला ७ साथीदारांसह मुलुंड पोलिसांनी अटक केली. सन 2000 साली गुलाम अली इसमाच्या हत्या प्रकरणी शिंदेला अटक झाली होती. मुंबई पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत सन 2000 सालानंतर अटक केली. मुंबईतून तडीपार केल्यानंतर ठाण्यात आश्रयाला गेला.
10 एप्रिल 2022 मध्ये मयूर शिंदे याने शिवसेना भाजपला रामराम ठोकीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनेक गुन्ह्यांची नोंद वाढू लागताच त्यांची सध्या राजकीय प्रवासाकडे वाटचाल सुरु होती. पक्ष कुठलाही निश्चित नाही मात्र राष्ट्रवादीच्या तिकीटावरून ठाण्यात निवडणुकाची तयारी करत होता.
मुंबईत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. एवढं सगळे पाश्वभूमी असताना संजय राऊत, सुनिल राऊत आणि जितेद्र आव्हाड या नेत्यांसोबतचे जास्त फोटो फेसबुकवर आहेत. याच फोटोंनी राऊतांना अडचणीत आणलं. पण राऊत मात्र या सगळ्या गोष्टींचा इन्कार करतायत. मयुर शिंदे ला हाताशी धरत सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राऊत करत आहेत.
राऊत काय म्हणाले ?
हे महाशय सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले.कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो.एकनाथ शिंदेया जवळच्या व्यक्तीस पकडुन शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा..राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काहीविषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात, असे ट्वीट संजय राऊत यांनी केलेय.
नरेश म्हस्केंचा आव्हाडांना टोला -
नरेश म्हस्केंनी मात्र नाव न घेता जिंतेद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. कथित धमकी प्रकरणात अटक केलेला मयूर शिंदे हा ठाण्यातील एकमेव सज्जन नेत्याचाही खास माणूस आहे ,हे म्हणत आहेत हे खरे आहे का ? असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
दरम्यान, आता प्रकरण एवढं गंभीर आहे की हा मयुर शिंदेचं सगळ्याबरोबरचं कनेक्शन बाहेर येतंय. त्यामुळे शिंदे सरकार असताना या शिंदेचं आता काय होणार? हे महत्वाचं आहे. राऊत यांच्या मागे आधीच अडचणींचा ससेमीरा लागला आहे. त्यात हे धमकी प्रकरण म्हणजे आणखी डोक्याला ताप झालाय. राऊतांच्या विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.