नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून सगळं खुसखुशीत चालू असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ या मोडमध्ये आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.


मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना भाजपतल्या सर्व कुरबुरी संपल्या असून आता सगळं खुसखुशीत आहे. भरलेलं ताट समोर असताना ताट उधळून लावण्याचा नतदृष्टपणा कुणी करणार नाही असंही राऊत म्हणाले. सत्तेत अधिकाराचा समसमान वाटप आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात जे ठरलेल आहे त्यानुसार पुढच्या सर्व गोष्टी घडतील असे संजय राऊत यांनी सांगितलं.

जर लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची भेट घेतली तर काय होत? अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे. तसेच विठ्ठल आमचं आराध्य दैवत असल्याचही राऊत म्हणाले.
VIDEO | आषाढी एकादशीला मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे एकत्र पूजेला? | ABP Majha



राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीवर शिनसेनेला काय वाटतं?

कोण कुणाला कशासाठी भेटतं याची डायरी घेऊन आम्ही बसत नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे आणि सोनिया गांधींच्या भेटीबाबत संजय राऊत दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी कालच्या भेटीची तुलना थेट बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधींच्या भेटीशी केली.  मात्र इंदिरा गांधींची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही, त्यांनी शिवसेनेच्या बरखास्तीचा डाव उधळून लावला होता, असंही संजय राऊत म्हणाले.

VIDEO | सोनियांच्या साथीनं मनसे 'राज'? | माझा विशेष | एबीपी माझा



राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीची बातमी येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज ठाकरे जवळपास 14 वर्षांनंतर काल दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएम आणि निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वाची मानली जातेय.

लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांची नाराजी लक्षात घेता राज ठाकरे यांना काँग्रेसनं दूर ठेवलं होतं. पण आता राज्यातील गरज आणि राज यांची क्रेझ लक्षात घेऊन काँग्रेस मनसेला सोबत घेणार का हा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं या भेटीचं स्वागत केलंय.