मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज (08 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. या काळात ते कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत.

फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी संवाद साधला यावेळी, राऊत म्हणाले की, पुढील काही काळ देवेंद्र फडणवीस राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत, त्याचीच आम्हाला जास्त काळजी आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर 'सिल्व्हर ओक' बाहेर राऊत माध्यमांशी बोलत होते.

भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे, यावर आम्ही ठाम आहोत.

फडणवीस यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राज्यात सत्तास्थापन होईल, असा दावा केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर भाजप सरकार स्थापन करू शकत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा

पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने आमच्यावर, आमच्या वरिष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे, ती आम्हाल मान्य नाही. त्यावर राऊत म्हणाले की, ज्या पक्षांनी भाजवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली, ज्यांनी भाजपचे वाभाडे काढले, आज भाजप त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसला आहे. असे बोलत असताना संजय राऊतांचा हरियाणातील सरकारकडे रोख होता.

 "महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र" - संजय राऊत



पाहा पत्रकार परिषदेत फडणवीस काय म्हणाले?