मुंबई : देशातील राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक घोषित झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार आणि ज्या पद्धतीने मागील निवडणुकीत फोडाफोडीचा डाव रंगला तसाच परत रंगणाच याचीच चर्चा होती. मात्र, आगामी लोकसभा तोंडावर असल्याने सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा सुरु असल्याची चर्चा आहे. नेमका हाच मुद्दा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सहाव्या जागेसाठी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा विचार करावा, अशी थेट मागणी केली आहे. सोबत त्यांनी महाविकास आघाडीकडील मतांचा सुद्धा उल्लेख केला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा! शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून 30 मते वेगळी आहेत. इतरही येतील. विशेष म्हणजे कोल्हापूर लोकसभेसाठी सुद्धा महाविकास आघाडीकडून महाराजांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. मात्र, त्यांनीच नकार दिल्याने चर्चा पुढे गेली नाही. दुसरीकडे, संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या 6 जागांवर आता कोण उमेदवार?
दरम्यान, राज्यातील 6 खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत असल्याने राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. भाजपच्या नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या 6 जागांवर आता कोण उमेदवार असणार आणि कुणाची नियुक्ती केली जाईल? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महायुतीचे पाच उमेदवार कोणते ?
भाजपने त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये आघाडीवर विनोद तावडे यांचे नाव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे.आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे भाजपच्या गोटातून समजतंय. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. बिहारच्या सत्तांतरात त्यांनी बजावलेली भूमिका आणि हरियाणात केलेली कामगिरी याचं बक्षीस त्यांना मिळेल असा बांधला जात आहे.
दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समजाची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची भाजप रणनिती आखतय. एकीकडे भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगलीय.. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे..तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या