Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा (Rajya Sabha Election) जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. महायुतीकडे 5 जागा तर महाविकास आघाडीकडे (MVA) एका जागा गेल्याचं समजतेय. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर एकमत झाल्याची राजकीय चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांचा गट निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे.
राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. भाजपच्या नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या 6 जागांवर आता कोण उमेदवार असणार आणि कुणाची नियुक्ती केली जाईल? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महायुतीचे पाच उमेदवार कोणते ?
भाजपने त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये आघाडीवर विनोद तावडे यांचे नाव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे.आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे भाजपच्या गोटातून समजतंय. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. बिहारच्या सत्तांतरात त्यांनी बजावलेली भूमिका आणि हरियाणात केलेली कामगिरी याचं बक्षीस त्यांना मिळेल असा बांधला जातोय. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समजाची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची भाजप रणनिती आखतय. एकीकडे भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगलीय.. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे..तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे..
महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजप : 104,
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
काँग्रेस : 45
शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
बहुजन विकास आघाडी : 3,
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1
अपक्ष 13