मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना - भाजप आणि मित्र पक्षांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु सत्तेचं समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपची मागील 30 वर्षांपासूनची युती तुटली. परिणामी या पक्षांना सत्तेपासून दूर रहावे लागत होते. परंतु शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने राज्यात सत्तास्थापन केली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (27 नोव्हेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याकाळात राज्यात खूप मोठी उलथापालथ झाली. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली. परंतु भाजपच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकट्याने तोंड दिले. त्यासोबत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लादेखील चढवला.

राज्यातील काही लोक युती तुटण्यास संजय राऊत जबाबदार असल्याची टीका करतात. परंतु युती तुटण्यास जितके राज्यातले भाजप नेते जबाबदार आहेत तितकेच त्यास दिल्लीतले नेतृत्वदेखील जबाबदार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एबीपी माझाच्या 'सामनावीर' या मुलाखतीच्या विशेष कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यापैकी एका जरी नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला असता आणि त्यांच्याशी सत्तापेचावर चर्चा केली असती तर आजचे चित्र वेगळे असते.

राऊत म्हणाले की, मोदी-शाह यांच्यापैकी एकाने फोन करुन उद्धवजींशी बोलायला हवं होतं. त्यांनी म्हणायला हवं होतं की, उद्धवजी बात करके इस समस्या का हल निकालते है. परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही.

दरम्यान संजय राऊत यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर युती तुटली असती का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, बाळासाहेब असते तर त्यांनीदेखील हेच केलं असतं. कदाचित यापूर्वीच त्यांनी हा निर्णय घेतला असता.

संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षातील काही लोकांना असं वाटत होतं की, शिवसेनेनं भाजपसोबतच युती ठेवून सरकार बनवायला हवं. परंतु मला माहीत होतं ही सगळी अंधश्रद्धा आहे. असं म्हणून राऊत यांनी शिवसेनेतल्या संबंधित लोकांना (युती तोडण्यास विरोध करणाऱ्या) लक्ष्य केले.

महाराष्ट्रानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप : संजय राऊत 



"आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती, एक पानसुद्धा तोडता येणार नाही"- उद्धव ठाकरे | ABP Majha