Sanjay Raut on Eknath Shinde: आज जे एकनाथ शिंदे आहेत ते राजन विचारे यांनी त्याग केल्यामुळे आहेत, आज ते शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत ते त्यांच्या त्यागाने आहेत. त्यामुळे त्यांनी रोज सकाळी राजन विचारांचे पाय धुवून तीर्थप्राशन केले पाहिजे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाणे हे शिवसेनेचे आहे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आहे, ते शिंदे गटाच्या मालकीचे नाही. आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ज्यांना त्रास झाला, ते सर्व शिवसेनेतून बाहेर पडलेले "गद्दार" आहेत आणि त्यांना दिघेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले. त्यांनी सांगितले की, आनंद दिघेंनी कधीही शिवसेना बिल्डरांना किंवा राजकीय व्यापाऱ्यांना विकली नाही आणि ते मातोश्रीशी नेहमी निष्ठावंत राहिले. आनंद आश्रमाची प्रॉपर्टी, जी दिघे साहेबांच्या काळात एक ट्रस्ट होती, ती आता कोणीतरी धमक्या देऊन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे.
राऊत यांनी खुलासा केला की, एकनाथ शिंदे हे राजन विचारे यांनी केलेल्या त्यागामुळे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले. त्यांनी सांगितले की, शिंदे यांच्या घरात एक दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर ते दुःखात होते. त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, राजन विचारे यांनी स्वतःहून आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की, एकनाथ शिंदे यांना सभागृह नेते बनवावे. विचारे यांच्या या त्यागाला उद्धव ठाकरे यांनीही मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारे यांचे आभार मानले पाहिजेत, असे राऊत म्हणाले.
आनंद दिघे यांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही
संजय राऊत म्हणाले की, मी काल केलेलं विधान हे अत्यंत जबाबदारीने केलं आहे. त्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागल्या आहेत. तुम्ही आनंद दिघे यांचा फोटो मोदींपेक्षा मोठा घ्या ना, मोदींना मोठं आणि बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करता ही भाजपची रणनीती आहे. महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व छोटं करायचं असल्याचे ते म्हणाले. काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो, हे कोण आहेत हे सर्व गद्दार आहेत. हे सर्व शिवसेनेतून बाहेर पडलेले एक नंबरचे गद्दार आहेत. गद्दार आणि निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही.
आनंद दिघे ठाकरे परिवार आणि शिवसेनेचा महत्त्वाचा घटक
त्यांनी सांगितले की, हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात, आनंद दिघे यांनी कधी शिवसेना विकली नाही. आनंद दिघे यांच्यावर अनेक संकट आली. त्यांना टाडाही लावला. परंतु, त्यांनी शेपूट घालून गांडू सारखं कधी पक्षांतर केलं नाही. ही सगळी कालची पोरं आहेत, ही बाहेर रस्त्यावर उभे राहणारी पोरं आहेत. काल जी पोरं होती ती सर्व टेंभी नाक्याच्या बाहेर टपोरीगिरी करणारी पोर आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. आनंद दिघे हे ठाकरे परिवार आणि शिवसेनेचे एक महत्त्वाचे घटक होते. ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही, त्यांनी सातत्याने मातोश्रीशी आपले निष्ठा कायम ठेवली होती, असे ते म्हणाले.
श्रीकांत यांचा शिवसेनेशी काय संबंध
श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे खासदार झाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की, "माझा मुलगा डॉक्टर आहे आणि सध्या त्याच्याकडे काही काम नाही," म्हणून त्याला तिकीट द्यावे. त्यावेळी गोपाळ लांडगे यांचे तिकीट कापून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली, असे राऊत यांनी स्पष्ट केले. श्रीकांत यांचा शिवसेनेशी काय संबंध आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या