Nashik Crop Damage : ऑगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Nashik Rain) शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील 40 गावांमध्ये तब्बल 4014.32 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले असून, यामुळे 7 हजार 108 शेतकरी बाधित झाले आहेत. हे नुकसान लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने 3 कोटी 81 लाख 67 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे (Maharashtra Government) सादर केला आहे.
सततच्या पावसाने शेती उद्ध्वस्त
नाशिक जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला समाधानकारक वाटणारा पाऊस, पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. सतत होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील मुख्य धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मात्र, या मुसळधार पावसामुळे हंगामी पिके जसे की कांदा, सोयाबीन, मका यांसह द्राक्ष, डाळिंबाच्या फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पंचनामे पूर्ण, पण मदतीची प्रतीक्षा
जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या सहकार्याने बाधित भागांमध्ये पंचनामे पूर्ण केले आहेत. यानुसार 40 गावांमध्ये 7108 शेतकरी बाधित असून, त्यांची नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. प्रशासनाने तपासणीनंतर तयार केलेला अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. मात्र, अद्यापही मदत मिळालेली नाही.
‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी
जिल्ह्यातील अनेक भागांतून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पाऊस जरी भरपूर झाला असला, तरी त्याचा प्रत्यक्ष फटका पिकांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न वाया गेले असून, आर्थिक अडचणींमध्ये भर पडली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
प्रशासनाच्या अहवालानुसार मागणी केलेली रक्कम 3 कोटी 81 लाख 67 हजार रुपये ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर सरसकट नुकसानभरपाई देण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
नाशिकमध्ये चार दिवसांपासून पावसाची हजेरी
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस होत असताना, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर गंगापूर धरणातून 698 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बुधवारीदेखील शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर वाघाडी नाल्यातून अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे बुधवारच्या बाजारात अचानक पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले होते. तर गुरुवारी (दि. 18) दुपारी शहरात दुपारी तीन वाजेनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
आणखी वाचा