नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रपती राजवट लागू होण्याअगोदरपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु काँग्रेसचे दिल्लीतले नेते त्यासाठी अद्याप अनुकूल नसल्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही. दरम्यान, आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी सोनिया गांधीवर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.

आज दिल्लीत सोनिया गांधी, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, ए.के. अँटोनी यांच्यात बैठक झाली. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी व्हावं की नाही याबद्दलचा निर्णय काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधींवर सोडला आहे. परंतु त्याआधी काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींसमोर त्यांची ठाम भूमिका मांडली आहे. सत्तास्थापनेला उशीर झाल्यास मोठं नुकसान होईल, असेही त्यांनी सोनिया गांधींना सांगितले.

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी सोनियांसमोर मांडल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय सत्तास्थापनेला उशीर झाल्यास नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान काँग्रेसचे 41 आमदार महाशिवआघाडीत सामील होण्यासंदर्भात सकारात्मक आहेत. तर अवघ्या तीन आमदारांचा महाशिवआघाडीत सामील होण्यास विरोध असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी सोनिया यांना दिली आहे. दरम्यान हा सत्तापेच सोडवण्यासाठी उद्या दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

व्हिडीओ पाहा