Sanjay Raut: 'बंडखोर आमदार नक्कीच परत येतील याची मला खात्री आहे. त्यातील काही आमदार हे नक्कीच परततील.', असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझा माझा कट्ट्यावर बोलताना केला. बंडखोर आमदारांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, हे सगळे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र होते.
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. ईडीचा (ED) चौकशीचा ससेमिरा, त्यांना झालेली अटक तुरुंगात आलेले आनुभव याबाबत त्यांनी सांगितलं. कोणत्या बंडखोर आमदाराच्या विषयी तुम्हाला ओलावा आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत यांनी उत्तर दिलं, 'मला सगळ्यांविषयी ओलावा आहे त्यांना जाण्याची गरज नव्हती. एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी असतील, हे सगळे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र होते. अशाप्रकारे ते जातील याची कल्पना काही लोक उद्धव ठाकरेंना देत होते पण विश्वास बसत नव्हता कारण त्यांना वाटत होते की, ती लोकं आपलीच आहेत.' असं ते म्हणाले.
आम्ही एका ताटात जेवणारी माणसं होतो: संजय राऊत
पुढे बंडखोर आमदार यांच्याबाबत संजय राऊत म्हणाले, 'ते सर्वजण माझे सहकारी होते. पक्षाचा नेता म्हणून मी त्यांच्यासोबत अनेकदा बोलत होतो. आम्ही एका ताटात जेवणारी माणसं होतो. त्यांचा विजय झाल्यावर रश्मी ठाकरे यांनी त्यांना ओवाळलेलं आहे. त्यांच्यावरती काही दबाव असतील. त्यांना तुरुंगात जायचं नव्हतं माझ्यासारखा माणूस तुरुंगात गेला मी गद्दारी केली नाही. मलाही तडजोडीची संधी होती पण मी स्वीकारली नाही. मी खूप खंबीर आहे. मी पक्षाबाबत ठाकरे कुटुंबाबत कृतज्ञ आहे.'
संजय राऊतांनी सांगितल्या तुरुंगातील आठवणी
'100 दिवसानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ज्या शिवसेनेत माझा जन्म झाला, त्या शिवसेनेचं नाव बदललं गेलं. ज्या शिवसेनेसाठी मी 40 वर्ष दिले, त्या शिवसेनेचं नाव चोरलं गेलं. ज्या धनुष्यबाणासाठी रस्त्यावर लढलो, ते राहिलं नाही. तुरुंगात असताना हे सर्व पाहत होतो. त्यावेळी तुरुंगाच्या गजावर हात ठेवत मी अस्वस्थ होत होतो.' असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: