Nagpur News : एकीकडे नागपूर महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 50 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनपाचे स्वच्छता कर्मचारीच रस्त्याच्या सफाईनंतर गोळा झालेला कचरा उचलून न नेता तिथेच जाळताना शहरातील विविध भागात दिसून येते. मात्र गुरुवारी असे करणे मंगळवारी झोनमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना महागात पडले. दोन महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड मनपाकडून वसूल करण्यात आला. एका नागरिकाने यासंदर्भात ट्विट करुन मनपा आयुक्तांना ट्विटरवर टॅग केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


सामान्य नागरिकांनी नियमांची पायमल्ली केल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून लगेच कारवाई करुन हजारोंचे दंड वसूल करण्यात येते. मात्र शहरात अनेक ठिकाणी दररोज सकाळी मनपाचे कर्मचारीच कचरा जाळत असल्याचे दिसून येते. मात्र याबद्दल तक्रार कुठे करावी, मनपा कारवाई करणार का असा प्रश्न याठिकाणी पडतो. मात्र यासंदर्भात एक ट्विट केल्यास संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येत असून मनपा आयुक्तांचे मनपाच्या सोशल मीडियावर 'वॉच' असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मनपा आयुक्तांनाही 'टॅग' केल्यास लगेच त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून आले.


गुरुवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने 196 प्रकरणांची नोंद करून 85300 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 12 प्रकरणांची नोंद करून 2400 रुपयांचा दंड वसुल केला. प्रत्येकी रु 400 प्रमाणे दंड ठोठावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी मलमुत्र विर्सजन करणाऱ्या 2 प्रकरणांची नोंद करुन 2000 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता पसरविणे या अंतर्गत 41 प्रकरणांची नोंद करून 16400 रुपयांची वसुली करण्यात आली. 


कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे यावर 100 रुपये प्रत्येकी दंड या प्रमाणे 48 प्रकरणांची नोंद करून 4800 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे यावर 400 रुपये प्रमाणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून रु 2800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर 2000 रुपये दंड प्रमाणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे (मनपाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करुन 10,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 1000 रुपये प्रत्येकी प्रमाणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 5000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  या व्यतिरिक्त इतर 47 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 9400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणाऱ्या संस्थांकडून 27 प्रकरणांमध्ये 27000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. 


मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे, हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या पथकासोबत कारवाई केली.