Sanjay Raut : सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. गेल्या 15 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत. पण त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवालही राऊतांनी सरकारला केला. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे आपोआपच पदव्या लागलेल्या असतात असेही ते म्हणाले. सावरकर हे हिदुह्दयसम्राट होते, त्यांच्यानंतर बाळासाहेब हेच हिदुह्दयसम्राट असल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी तुम्हाला इतकेच प्रेम असेल तर त्यांना देखील भारतरत्न द्यावा, असेही राऊत म्हणाले. या पदव्या दिल्यामुळं सावरकर किंवा बाळासाहेब मोठे होणार नाहीत, तर पदव्या मोठ्या होतील असेही राऊत म्हणाले.


बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्या हातात


बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ही फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. कारण बाळासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये निष्ठा आणि अस्मिता या शब्दाला महत्व प्राप्त करुन दिलं आहे. त्याच तेज कोणालाही हिरावून घेता येणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसेनाप्रमुखांना जाऊन दहा वर्ष झाली. त्यांच्यानंतर शिवसेना तोडण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी केल्याचे राऊत म्हणाले. आता जे म्हणतायेत बाळासाहेबांचा विचार आमचा, ते ढोंगी आहेत. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केल्याचे राऊत म्हणाले.


 शिंदे गटावर निशाणा


महाराष्ट्रामध्ये ढोंग चालणार नाही हे सतत बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यांनी ढोंग आणि खोटेपणा याचा त्यांनी कधीही पुरस्कार केला नाही. दुर्दैवानं या महाराष्ट्रात काही लोकं आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगत आहेत, ते ढोंगी आहेत असे म्हणत राऊतांनी शिंदे गटावर टीका केली. ते लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्राची जनता बाळासाहेबांच्या विचाराने आजही भारावत आहे, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती मशाल घेऊन पुढे जाऊ असे राऊत म्हणाले. 


बाळासाहेबांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचं बळ दिलं


बाळासाहेब ठाकरे जर आज असते आणि कबरेखालचे घाव करणाऱ्यांची अवस्था फार वाईट करुन सोडली असती असे राऊत म्हणाले. बाळासाहेबांचे फटकारे, त्यांची भूमिका यामुळं महाराष्ट्राला मजबुती मिळाली. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचं बळ दिलं कारण ते हिमालयापेक्षा मोठे होते. आज त्या तोडीचं नेतृत्व या राज्यात आणि देशात नसल्याचे राऊत म्हणाले. दुसरे बाळासाहेब ठाकरे निर्माण होणार नाहीत. बाळासाहेबांच्या नावानं जे तोतया निर्माण होतायेत, ते फारकाळ टिकणार नाहीत. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार आमच्या नसानसात आणि मनगटात भिनवला आहेत, असे राऊत म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


हातातले खंजीर बाजूला ठेवा, मगच बाळासाहेबांच्या स्मारकावर या; संजय राऊतांनी शिंदे गटाला थेटच सुनावलं