Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला डिवचलं आहे. हल्ला फक्त मलिक यांच्यावर बाकीचे यांच्या मांडीवर अशा शब्दात हल्लाबोल करत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र, आज मलिक हे थेट सत्ताधारी बाकांवर बसल्याने विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भाजपची भूमिका विधान परिषदेत मांडली. मात्र, त्याच वेळेस सायंकाळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून मलिकांच्या महायुतीतील समावेशला विरोध केला. फडणवीस यांच्या पत्रानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला.
संजय राऊत यांचा बोचरा वार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या पत्रावरून भाजपवर बोचरा वार केला. अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली असल्याचा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला. राऊतांनी पुढे म्हटले की, त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल,सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी,सरनाईक, मुलुंडचे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर.बाकीचे यांच्या मांडीवर! अशी टीका करताना पिते दूध डोळे मिटूनी..जात मांजराची.. असा टोला लगावला आहे.
सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
नवाब मलिक यांच्या अजितदादा गटाच्या सोबत येण्यावरून देवेंद्रजींनी एक पत्र दादांना लिहिल्याचे समजते, ज्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने त्यांना सामावून घेऊ नये असे सांगितले आहे. सगळ्यात गमतीदार भाग आहे, दिवसभरातल्या एकूण घडामोडी पाहता, ज्या पद्धतीने देवेंद्रजी ट्रोल झालेले आहेत आणि महाराष्ट्राला ते पचन झालेलं नाही. त्यानंतर त्यांनाही उपरती आली आहे. पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा असेही म्हणत आहेत. परंतु देवेंद्रजींना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, सत्तेपेक्षा देश मोठा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले, त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेक कुठे गेला होता?