Sanjay Raut Exclusive On Nana Patole: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असं म्हणत खोचक टोला काल लगावला होता. यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले यांच्या मुंबईतील प्रभागरचनेच्या आक्षेपावर आणि मुंबई तुंबण्याच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटले आहेत. काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचं मुंबईवर राज्य होतं पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होतं. पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो, असंही राऊत म्हणाले. 


नाना पटोलेंनी नेमकं काय म्हटलं होतं
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नाना पटोले म्हणाले होते की, दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली येते. अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर राहिला आहे. त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असं पटोलेंनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे. नाना पटोलेंनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कोर्टात या बाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.  


किरीट सोमय्या यांच्यावरही संजय राऊतांचे आरोप


यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या आमच्या सहकार्‍यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे? मुंबईत पोहोचल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या फ्रॉडचं, भ्रष्टाचाराचं एक मोठे प्रकरण उघड करणार आहे. किरीट सोमय्यांची भविष्यात जी प्रकरणं पुढे येतील ती पाहिल्यानंतर रस्त्यावर लोकं त्यांना फटकावल्या शिवाय राहणार नाहीत, असं राऊतांनी म्हटलं आहे. 
 
संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाचे काम आहे भोंग्या शिवाय बोलत राहणं. भोंगे हे विधायक कामासाठी चालत राहिले पाहिजेत. द्वेष निर्माण करण्यासाठी दंगली निर्माण करण्यासाठी तुमचे भोंगे चालवू नका ही महाराष्ट्राची परंपरा नाही. तुम्ही विरोधी पक्षाचे काम उत्तम करत राहा, निवडणुका येतील तेव्हा लोक ठरवतील, असंही ते म्हणाले. 


महाविकास आघाडीत सामील व्हावं, राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला


राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, अपक्ष लढायचं असेल तर त्यांनी त्यांच्या हिमतीवर लढावं. महाविकास आघाडीने सहावी जागा लढायची हे एकदा ठरवले आहे. संभाजीराजेंविषयी आमच्या मनात आदर आहे. उद्धवजी त्यांना मानतात. तुमच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावं.. मी उभा आहे अपक्ष आणि मला सगळ्यांनी मत द्या असं राजकारणात होत नाही. आधी स्वतःची मतं किती आहेत ते सांगा.आमच्याकडे मते नसतील तर कुणाकडेच नाहीत. शिवसेनेचा उमेदवार जिंकून आणू, असंही ते म्हणाले. 


ब्रजभूषण कुठल्या मातीचे बनले आहेत हे मला चांगलंच माहिती


खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या राज ठाकरे यांना होणाऱ्या विरोधावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,  ब्रजभूषण कुठल्या मातीचे बनले आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. मी त्यांना 35 वर्षे ओळखतो. त्या माणसाला कधी माघार घेताना पाहिलेले नाही. अयोध्येमध्ये जाणाऱ्या माणसाचं मन साफ असावं लागतं.  आमचे ठाकरे आहेत, त्यांचं अयोध्येशी नातं आहे. आम्ही काही आमचे आमदार वाढावेत खासदार वाढावेत म्हणून जात नाही आम्ही रामराज्याची प्रार्थना करण्यासाठी जात आहोत, असं ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sanjay Raut Exclusive : किरीट सोमय्यांची प्रकरणं पुढं आल्यावर लोकं त्यांना रस्त्यावर फटकावतील; संजय राऊतांचा हल्लाबोल 


Kirit Somaiya : नवलानी प्रकरणाचा तपास कुठंवर आला? सोमय्यांचा सरकारला सवाल