Sanjay Raut Bail: शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. 100 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. संजय राऊत यांच्या जामीनाची कागदपत्रे तुरुंगात पोहचल्यानंतरच त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होईल, असे तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 


आर्थर रोड तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर संजय राऊत थेट मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  उद्धव ठाकरे हे स्वतः खासदार संजय राऊत यांचा मातोश्री वर स्वागत करणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या मातोश्रीवर अलिबाग, सिधुदुर्ग  जिल्हाप्रमुख संपर्क प्रमखांच्या बैठका घेत आहेत.  संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी संजय सावंत यांच्या फोनवरून संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरेंशी बोलताना संजय राऊत भावूक झाल्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय आदित्या ठाकरे यांनीही संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या जामीनावर महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून आनंद व्यक्त होतोय. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केलेय. राऊतांना जामीन मिळाल्यानंतर कोण काय म्हणाले?


संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले : आदित्य ठाकरे
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे."


शेर वापस आया है! - सुषमा अंधारे
संजय राऊत यांना जामीन मिळताच सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेर वापस आया है, अशी प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली. यावेळी अंधारे भावूक झाल्या होत्या, त्यांचे डोळे पानावले होते.  सुषमा अंधारे म्हणाल्या,  शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचे बळ संचारले. संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळी असून आम्ही उत्साहाने साजरी करणार आहे. आमच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आमचा सेनापती परत आला आहे.


रोहित पवार काय म्हणाले?
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय. त्याला फक्त सत्यमेव जयते! असं कॅप्शन दिलेय.  पिंजऱ्यातून एक वाघ बाहेर पडत असल्याचा व्हिडीओ राऊतांनी पोस्ट केलाय.  


अंबादास दानवे काय म्हणाले?
अंबादास दानवे यांनी ट्वीट करत राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे.  ते म्हणाले की, माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या सांभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
संजय राऊत लवकरच बाहेर येतील. मी भविष्य सांगू शकत नाही. वास्तवतेत जगते. आमचे जे-जे नेते जेलमध्ये आहेत. ते त्यांच्या केसेसमधून निर्दोष बाहेर येतील. ते महाराष्ट्र, भारताच्या सेवेत पूर्ण ताकदीने लागतील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.  


सामंत काय म्हणाले?
 संजय राऊत सुटल्यानं आम्ही अडचणीत येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच न्यायालयाच्या निकालावर बोलण्यास त्यांनी नकार दिला, याबाबत आपल्याला माहित नसल्याचं ते म्हणाले.  


राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यावर काही भाष्य करणार नाही. पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.  जल्लोष म्हणजे महाविकास आघाडी एक प्रकारे असुरी आनंद व्यक्त करत आहे. स्वतःचं अपयश झाकण्याचा महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहे. पण जे सत्य आहे ते मान्य केले पाहिजे, कोण तुरुंगात जाते, असेही पाटील म्हणाले..


नागपुरात जल्लोष 
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात जल्लोषात शिवसैनिक आनंदात मशाल हाताळताना एका शिवसैनिकाच्या केसांनी आणि डाव्या हातावरील शर्टाने अचानक पेट घेतला. त्यामुळे तो एकच गोंधळला... यावेळी शेजारी असलेल्या इतर शिवसैनिकांनी त्या  शिवसैनिकाच्या केसांना आणि हाताला आग लागल्याचे पाहून तत्परतेने त्याच्या डोक्यावरील आणि हातावरील आग विझवली. सुदेवांनी यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली नाही. म्हाळगी नगर चौकात ढोल ताशांच्या तालावर शिवसैनिक नाचत असताना ही घटना घडली..