मुंबई : अविश्वास ठरावात सहभाग न घेण्याचा निर्णय योग्यच होता. शिवसेनेने वेळ चुकवलेली नाही, आम्हाला कुठे काय करायचं ते माहित आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि आम्ही त्याचं पालन करतो, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेत अविश्वास ठरावात मतदान न करण्याच्या निर्णायचं पुन्हा एकदा समर्थन केलं.
‘माझा कट्टा’वर संजय राऊत यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. हा संपूर्ण कार्यक्रम आज सायंकाळी सहा वाजता आणि रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाचं कौतुक असो, किंवा ठाकरे सिनेमा, किंवा भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध. सर्व मुद्द्यावर सडेतोड उत्तरं देत त्यांनी आगामी लोकसभेत अविश्वास ठरावात जे चित्र दिसलं ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उलटं असेल, असा दावा केला.
“बहुमत विकत घेतलं जातं’’
मोदी सरकारविरोधातला पहिला अविश्वास ठराव लोकसभेत पडला. सरकारच्या बाजूने 325 मतं पडली, तर विरोधकांच्या बाजूने केवळ 126 सदस्य होते. एकूण 451 सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. बीजेडी आणि शिवसेनेने मतदानाला गैरहजेरी लावली.
सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळवणं फार मोठी गोष्ट नाही. बहुमत हे विकत घेतलं जातं. तामिळनाडूतील एआयएडीएमके पक्षाने पाठिंबा दिला यामागे त्यांची मजबुरी होती. त्यांनी पाठिंबा दिला नसता तर त्यांच्या राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
“2019 ला राज्यात शिवसेनेची सत्ता’’
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आमचा सर्वांचा हट्ट आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपला अजूनही मोठा भाऊ मानत असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. भाऊ हा भाऊ असतो. अगोदर ठरल्याप्रमाणे भाजप केंद्रात मोठा भाऊ होता, आणि राज्यात शिवसेना, असं त्यांनी सांगितलं.
“राहुल गांधी योग्य विरोधक’’
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून ‘भावा जिंकलंस’ या मथळ्याखाली राहुल गांधींच्या भाषणाचं कौतुक करण्यात आलं आहे. राहुल गांधी हे योग्य विरोधक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. देशातील जनतेच्या अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींनी भाषण केलं. संसदेत एका चांगल्या विरोधकाची गरज असते, ते गुण राहुल गांधी यांच्यात आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
“ठाकरे सिनेमाचा सिक्वल येणार’’
अलीकडच्या काळात येणाऱ्या बायोपिकचं संजय राऊत यांनी समर्थन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांदी यांच्यावरही सिनेमे यायला हवेत. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचा दुसरा भागही येणार आहे. शिवाय कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर सिनेमा बनवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
अविश्वास ठरावात जे चित्र दिसलं, ते 2019 ला उलटं असेल : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2018 01:54 PM (IST)
‘माझा कट्टा’वर संजय राऊत यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. हा संपूर्ण कार्यक्रम आज सायंकाळी सहा वाजता आणि रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -