जगभरातल्या नेत्यांना मिठ्या मारता, राहुल गांधींच्या मिठीला प्रॉब्लेम का? : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2018 11:07 PM (IST)
परदेश दौऱ्यांमध्ये नरेंद्र मोदींनी जगभरातील नेत्यांची गळाभेट घेतली आहे. आज मात्र राहुल गांधी मोदींची भेट घेण्यासाठी आले तेव्हा, मोदी उभे राहिले नाहीत. यावरच राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
NEXT PREV
मुंबई : अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद मोदींची घेतलेली गळाभेट देशभर चर्चेचा विषय ठरली. या ऐतिहासिक गळाभेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. परदेश दौऱ्यांमध्ये नरेंद्र मोदींनी जगभरातील नेत्यांची गळाभेट घेतली आहे. आज मात्र राहुल गांधी मोदींची भेट घेण्यासाठी आले तेव्हा, मोदी उभे राहिले नाहीत. यावरच राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ‘जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती?’ असा सवाल आपल्या ट्वीटमध्ये राज यांनी मोदींना केला आहे. दरम्यान, टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा झाली. यावेळी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली. सुरुवातीला आक्रमक टीका करणाऱ्या राहुल यांनी नंतर मोदींकडे जात त्यांची गळाभेट घेतली. ‘तुमच्यासाठी मी पप्पू आहे, मात्र माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही,’ असंही भाजपला उद्देशून राहुल गांधी म्हणाले.