सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागमीसाठी सोलापुरात मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शिवाजी चौकात आंदोलकांनी गर्दी केली आहे. शिवाजी चौक आणि संभाजी चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

आंदोलकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. वारी सुरळीत व्हायची असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात पाय ठेवू नये. पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेत पांडुरंगाची पूजा करण्याचा प्रयत्न करु नका. समाजाची फसवणूक करून पंढरपुरात याल तर उद्रेक होईल, असा इशारा सोलापूर सकल मराठा समाजाने दिला आहे.

लाईव्ह अपडेट



  • औरंगाबाद - क्रांती चौकात ठिय्या आंदोलन, सत्ताधारी नेत्यांविरोधात घोषणाबाजी

  • सोलापूर - चक्का जाम आंदोलनातील कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांची एका एसटी बसवर दगडफेक

  • लातूर-सोलापूर रस्त्यावर औसा शहरातील चौकात चक्का जाम, वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा


लातूरमध्येही चक्काजाम

लातूर-सोलापूर आणि लातूर-उमरगा रस्त्यावरील औसा चौकातील मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनामुळे मोठा वाहतूक कोंडी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक सकाळपासूनच रस्त्यावर बसले आहेत. हा कायमच वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जालन्यात शोले स्टाईल आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरु झाली आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल ‘शोले स्टाईल’ आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर ठिय्या मांडला होता.

मराठा समाजाच्या वतीने परतूर, मंठा जाफराबाद येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी परळी  आंदोलनाला पाठिंबा म्हणून बदनापूर येथे देखील आंदोलन केलं. या आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज सकाळपासून पाण्याच्या टाकीवर ठिय्या मांडला होता.