सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीवर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने टीका केली. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी ही टीका केली.


राजू शेट्टी हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. पण आजपर्यंत आपल्या गळ्यातील मंगळसूत्र कुणाचं आहे हे ते सांगत नव्हते. मात्र राहुल गांधींसोबतच्या भेटीतून ते मूळचे काँग्रेसचेच असल्याचं आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हे काँग्रेसचं असल्याचं सिद्ध झालं. ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर वेगवेगळ्या कायद्यातून टाच आणली त्याच काँग्रेससोबत राजू शेट्टी काही दिवसात गेलेले दिसतील, असंही शेतकरी संघटनेने म्हटलं आहे.

काँग्रेस प्रणित यूपीएशी राजू शेट्टीची ही जवळीक म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, असा आरोपही शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केला.

राजू शेट्टी आणि राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट झाली. या भेटीनंतर भाजपप्रणित एनडीएची साथ सोडलेले राजू शेट्टी आता यूपीएची साथ देणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

येत्या 29 मार्च रोजी देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी राजू शेट्टींनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणारे राजू शेट्टी 2019 च्या निवडणुकीला यूपीएसोबत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यासंदर्भातील अधिकृत घोषणा केलेली नाही.

या भेटीच्या वेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हे उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. सत्तेत सहभागी असूनही राजू शेट्टी कमालीचे नाराज होते. त्यामुळेच सत्तेला रामराम ठोकून ते एनडीएमधून बाहेर पडले होते.

संबंधित बातम्या :

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यूपीएसोबत?


कशी ठरली राजू शेट्टी आणि राहुल गांधींची अचानक भेट?